Showing posts with label मराठी कथा. Show all posts
Showing posts with label मराठी कथा. Show all posts

तोळाभर सुख...(ग्रामिण कथा)

| |

महादानं हिरीत डोकावून
बगितलं.,हिरीला आसलेल्या बारकुल्या नळाचा निस्ता लेकरू
मुतल्यावानी चुळूचुळू आवाज येत व्हता..!!मोटारी
चा फुटबालबी झाकणार न्हायी इतकुस
पाणी व्हतं..!!त्येच्यावर गणगण
मव्हळाच्या माशा,किटकुल,आन
वरच्या जांबाच्या झाडाचा सम्दा पालापाचुळा तरंगत
व्हता..!!हिरीच्या भिताडातून

हरवलेली कविता.. (कथा)

| |

एकदा...दोनदा..तिनदा त्यानं डोअरबेल वाजवली,पण आतून कसलीही चाहूल नाही..!तो वैतागला..''झोपली असेल महाराणी,साडेसात वाजताच..तरी म्हणतं होतो,आईला चार-आठ दिवस आणावं....पण सालं ह्या ऒफीसच्या कामानं सगळा घोळ घातला..!!' असं मनातल्या मनात पुटपुटत,तणतणत,आपला पुरुषी अहंकार थोडासा बाजुला ठेवत त्यानं खांद्यावरच्या बॅगमधून त्याची चावी काढली व दरवाजा उघडला.रागाने लाल झालेले डोळे तिचाच शोध घेत होते..

बापू.. (व्यक्तिचित्रण)

| |

बालपणीचा काळ खरचं सुखाचा असतो..मग ते बालपण
कितीही गरिबीतले असले तरिही..आमच कुटूंब खर्या अर्थान
फार मोठ्ठ होत...जवळपास वडिल धरुन
सहा चुलत्यांचा विस्तार..सगळ्याच्या चुली वेगळाल्या पण
बाकी कारभार सगळा एकत्र..सगळ्याच्या एका रांगेत दोन
दोन
खोल्या होत्या..अन बाहेर एक ऊंबराच आभाळ कवेत घेणार
एक
मोठ्ठ झाड..आणि त्या झाडाखाली एक
बांबूची,सणकाड्यांनी शाकारलेली झोपडी असायची अन तिथे
रहायचा या सगळ्या खटल्यावर लक्ष
ठेवणारा 'सम्राट'..बापू..आमचे आजोबा..!!
आजी बापूला केव्हा सोडून गेली मला कळत नव्हते..पण
तेव्हापासुन बापूंनी सगळ्यांच्या खोल्यापुढ
निवारा शोधला होता..मला आठवतं,बापू कुणाच्याही खोलीत
कधी गेलेच नाही..रापलेला चेहरा,पण माया दावणारे बारिक
डोळे,चिलिम ऒढुु ओढु खप्पड झालेल्या गालावर पिळ
दिलेल्या मिशा,तुळतुळीत दाढी,डोक्याला सदैव
पिवळा पटका,मस्तकावर अष्टगंध
आणि बुक्का..कानाच्या दोन्ही पाळूला दारावतीचे
ठिपके...काही शाबुत तर काही दातांनी रामराम
ठोकलेला,सहा फुट ऊंचीला शोभणारी शरिरयष्टी..अन सतत
हातातल्या तुळशीच्या माळेशी,बोटांची चाललेली स्पर्धा..पायात
करकर वाजणारी नर्ही अन धोतर-
बंडीतली ती मूर्ती आजही आठवते..
आमच पन्नास ऎकराच्याही वरच रान असेल तेव्हा..पण सगळ
ऎकत्र होतं..बायाबायांची भांडण नव्हती..भावाभावांचे वाद
नव्हते..फक्त स्वयंपाक वेगळा अन
झोपायच्या खोल्या..बाकि सगळ्यांची जेवण सकाळ
संध्याकाळ
बापूच्या समोर
ऊंबराच्या झाडाखाली गोपाळकाला व्हावा तशी व्हायची..बापू
जास्त बोलायचे नसत मोठ्यासोबत..पण आम्हा लहाणासोबत
अगदी लहान होवून
रमायचे..माझ्यापेक्षा माझ्या मोठ्या बहिणीवर बापूंचा जीव
जास्त..ती जरा तब्येतीने सगळ्या मुलात कृश होती..मी तर
पहिल्यापासून दांडगटच..त्यामुळे आमच्या चोरून बापू
तीला खोबरं,गुळफुटाणे,पेरू अस जे दिसेल ते आणायचे..तिने
खाऊन ऊरल की मग बापू आम्हाला हाळी द्यायचे..पण
म्हणून
ते आमच्यासाठी वाईट कधीच झाले नाहित..ऊलट
त्या बहिणीकरता अन बापूकरिता आमचा जीव अधिक
तुटायचा..
बापू सुनांना म्हणजे आईना ,काकूंना कधहि ऎकेरी बोलायचे
नाही..अहो-जाहो करायचे..वडिलांच्या अन
चुलत्यांच्या बाबतीतही तेच..बापूना कधी सुनांना जेवण
मागण्याच
काम पडल नाही..कारण बापू आल्याशिवाय कुणिच
जेवायला बसायच
नाही..आमच्यासारखी चिल्लीपिल्लीही बापूच्या वाटेकडे डोळे
लावून असायची..बापूकडे
गोष्टींचा खजाना होता..ऊडती माडी,फिरता कळस,कळवातनीची
कथा,दामु सुताराची कथा न जाणो अशा कैक
गोष्टींना आमच्याबरोबर
रात्रीला मोठी माणसही हजेरी लावायची..बापूची चिलिम खास
आवडायची मला..त्यातील कपडा पाण्याने धुवून देणे ,तंबाकु
साफ करणे,खडा पुसून देणे ई.कामे
करता करता मलाही कधीकधी ती ओढून पहायचा मोह
होई..पण
ऎकदाच नुसती चिलीम ओठाला लावून पाहण अन
बापूंची सनकन
गालात वाजण झाल..तेवहापासून तो मोह आवरला..पण सुप्त
ईच्छा आजतागायत कायम आहे..
आमच रान फारस पिकायच नाही..किंवा तॆव्हाचा काळच
दुष्काळाचा होता अस म्हटल तरी हरकत नसावी..त्यामुळे
रानात मिळणार्या गोष्टींचेच खेळणे,खाणे
असा लळा बापूंनी लावून दिला होता..बापूंना मात्र
चहा हमखास
दोनचार वेळेस लागायचा..गूळाचा..दुध नसले तरी चालेल पण
त्यांच ऎक पितळी दिड दोन कपाच 'गटले' असायच ते भरुन
चहा लागायचा..पण ते ही कोणत्या सुनेला सांगायच काम
नव्हत..कुणीही चहाच आंदण ठेवल की ती ऒरडून
सांगायची,'बाईवो,म्या मामाजीले च्या ठुला बरं..' अन
बापूच्या चेहर्यावर स्मीत
पसरायच..मी सहा वर्षाचा होईपर्यन्त
मला बापूचा साथ लाभला होता..बापूच्या आठवणी खुप
आहेत,मला फारशा आठवत नाही..पण
जितक्याही आठवतात,तरळलेल्या डोळ्यातून बापू दिसतात..
अखेरच्या दिवसात बापू फार खंगले होते,खाण्यापिण्याच
काही ददात नव्हती..पण या वळणावर त्यांना 'आजी जास्त
आठवत असावी..त्यांच चिलिम पिण्याच प्रमाण ही खुप झाल
होतं..सतत खोकॊक..रात्री बेरात्री खोकल्याची उबळ
ऎकल्यावर पटकन बाबा अन चुलते तिकडे
धावायचे..सगळ्यांना..व बापूंनाही कळून चुकलेल
होत..होणारी गोष्ट होणार आहेच..गावात डोक्टर नव्हतेच,एक
दिवस असीच जोरदार उबळ आली..वडिलांनी पटकन
गाडी जुंपून
बापूला गाडीत घेतले सोबत लहाने चुलते व शहराच्या दिशेने
धावले..पण सकाळपर्यंत बापूच निष्प्राण कलेवर दारात
होत..बापून घरादाराला काय दिल त्यावेळी कळतं नव्हत..आज
जाणवतय,बापूंनी घराला 'घरपण' दिलं होतं....!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

बाॅर्न इन द गारबेज (रसग्रहण)

| |

लघुकथांनी मराठी साहित्याचं फार मोठं क्षेत्र व्यापलेल
आहे.आजच्या पिढीच्या लघुकथा पुर्वीच्या कपोलकल्पित
किनारी,चन्द्रतार्यांच्या साक्षी,बागेतल्य
ा गुजगोष्टी इत्यादींना फाटा देत
आपल्या अवतीभोवतीच्या नोंदींना डोळसपणे बघायला शिकवत
आहे.लघुकथांच वैशिष्ट्यच अस असत की,त्या एका ठराविक
वळणावर वाचकांना आणून सोडतात..तिथून पुढचा विचार
वाचकांना करायचा असतो..नव्हे तो आपसूकच केल्या जातो..!
चार दिवसापुर्वीच आमचे मित्र प्रा.सावन गिरीधर धर्मपुरीवार
यांनी मोठ्या अगत्याने पाठवलेला,त्यांच
ा पहिलावहिला लघुकथासंग्रह 'बाॅर्न इन द गारबेज' साभार
भेटला..विजय प्रकाशन,नागपुर ह्यांनी प्रकाशित केलेला,विवेक
रानडे ह्यांचे सुंदर मुखपृष्ठ आणि के.ज.पुरोहित 'शांताराम' व
आशाताई बगे यांची सुंदर प्रस्तावना लाभलेला..व तितक्याच
आशयघन,काळजाचा ठाव घेणार्या कथांनी परिपुर्ण
असलेला..मुखपृष्ठावर 'गारबेज' मध्ये असणार्या वस्तुत
दिसणार्या 'लाल' रंगाच्या ठिपक्यांनी कथा वाचण्याच्या अगोदर
बरचं काही सांगितल..संग्रहाच नाव नी बर्याच
कथा इंग्रजी शिर्षकात आहे..पण उलट त्याने काही वावगं वाटल
नाही..लेखकाच वेगळेपण,कथांच नवेपण ह्या नावांनी अधिक ठळक
जाणवतयं..नव्हे ते समर्पकही आहेच..!
लेखकाच्या बर्याच
कथा स्वतःच्या अवतीभोवती घडलेल्या वाटतात.रोजच्या जगण्याच्या धावपळीतून
आपल्या आजुबाजुला बघण्याची लेखकाची दृष्टी सकस
आहे.'नागपुरी वैदर्भीय बोली' व नागपुरच्या आसपासचे संदर्भ
लेखकाची आपल्या मातीशी घट्ट असलेली नाळ दर्शवितात..!
एकून नऊ कथांचा समावेश असणार्या ह्या संग्रहाने आपले
'वेगळेपण' निश्चित जपले आहे.पहिल्याच 'मेजवानी' कथेत
माणसांचे स्वार्थी,विकृत चेहरे,मेलेल्याला पुनः मारणारे,मुडद्या
ंच्या टाळूवरचं लोणी खाणार्या नराधमांचे दिसतात.मन,सुन्न
होत..,अन आपल्या भोवतालचे 'असे' चेहरे ठळक
जाणवायला लागतात.'मोलकरीन' कथेत मोलकरणींची कामे
करून,शिक्षणात यश मिळवणार्या 'गौरी'च कौतुक वाटत..पण
गौरीच्या मेहनतीला सलाम करणार्या,जीवनाच तत्वज्ञान
समजलेल्या 'केतकी'चा खर्या अर्थान अभिमान
वाटतो.कथेची खरी नायिका 'केतकी'च हे जानवून जात.'वेटींग फाॅर
व्हॅलेन्टाईन' वाचत वाचत शेवटापर्यन्त जातांना, एका तरल
प्रेमकाव्याच्या विश्वात विहरल्यासारखे वाटते.सुंदर शब्द
नी मनाचा ठाव घेणार्या खोल विहिरीसारखं..पण
शेवटी नायकाला 'कॅन्सर' असल्याच कळल्यावर नकळत
'कारुण्याची किनार' मनाला उदास करून जाते.!!
'एकोणतीस मार्च' संग्रहातली सगळ्यात उत्कृष्ठ
कथा ठरावी.,ईतकी ती वाचकांच्या काळजाला हात
घालते..नकळतचं डोळ्यांच्या कडा पाणावल्या जातात..याच खास
श्रेय..लेखकाच्या डोळस असणार्या सामाजिक दृष्टीला...'सवारी'
'जाईजुईंनी गच्च भरलं आकाश' ह्या कथा सामान्यांचे
जगण्याचे,मुलभूत गरजांचे व यामधून
होणार्या जिवाच्या घालमेलीच दर्शन घडवतात.'बायोग्राफी'
कथेतून महाविद्यालयीन शेतकरीपुत्राच मनोविश्व
वाचतांना काळीज करपून जाते..शेतकर्यांच्या समस्यांच्या जवळ
जाणारी कथा..'सेमिनार' ही कथाही अशीच वाचकांवर आपली छाप
सोडून जाते.!!
शिर्षक कथेत,आजच्या भरकटलेल्या तरुणाईच यथार्थ चित्रण
करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत..आजच्या स्वैर
नातेसंबधातून जन्माला आलेल्या अर्भकांची ससेहालपालट
कमालीची अस्वस्थ करते..चिड येते.!
प्रा.धर्मपुरीवार यांचा पहिलाच प्रयत्न प्रभावीपणे, सशक्तपणे
वाचकांच्या पसंतीस उतरला जातो..लेखकाच नवखेपण
कुठेही जाणवत नाही..काळाच्या ऒघात वाहवत असतांना,क्षणभर
का होईना,थोडसं थांबून आपल्या आजुबाजुला बघायला लेखक
भाग पाडतात..!!
प्रा.सावन गिरीधर धर्मपुरीवार यांचे अभिनंदन
आणि भविष्यासाठी खुप शुभेच्छा...!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
  9975767537


बाजार (लघुकथा)

| |

मार्च महीण्यातले रणरणते उनं..गावातला आठवडी बाजार
गच्च फुललेला होता..लग्नसराईचे दिवस असल्यानं सगळ्याच
दुकानवजा पालावर आजुबाजुच्या खेड्यावरील
बाया,माणसे,मुला-मुलींची गर्दी मावत
नव्हती..ज्या मुलींची लग्न ठरलेली होती त्या मैत्रिणीसोबत
कटलरी-स्टेशनरी च्या दुकानावर 'नकपालीस',मेंदी
कोण,पावडर,लाली,चमकी,बिंदी,'भारी'चे सेंट,हातरुमाल,छोटे
आरसे घेतांना मध्येमध्येच वेड लागल्यागत खुदकन हसत
होत्या..या सगळ्यामध्ये बिचार्या दुकानदाराची त्रेधातिरपिट
उडत होती..
यावेळेस जनासेठच्या कपड्याच्या दुकानात बरीच
गर्दी होती..लगनसराईचा भरपुर माल
वाढवलेला होता..पातळे,साड्या,परकर,रुमाल,टोप्या,लुगडे,पिस
व काही रेडीमेड कपड्यांनी दुकान खचाखच भरले होते..दोन
नोकरांना दम नव्हता..मध्येच जनासेठही, ''बाई,कपडा पाह्य
हात लावून..गादीपेक्षा नरम लागते का नाही..पोलिस्तर
थोडीच हाये ते'' अशी वाक्य फेकत मध्येच ''रामराम
हो पाटील..या काय दाखवू?? अशी आवभगत करीत होते..
रामकिसन हलवाई अन त्याची बायको गरमागरम जिलेबी-भजे
काढण्यात गुंग होती..बाजारात थकली-भागली माणसं तिथच
पालात बसून त्यावर ताव मारीत होती..भट्टीवर रामकिसन
असल्यानं त्याच्या टकलातून
येणारा मार्चचा पावसाळा तो राहून राहून
त्याच्या ओल्यागच्च झालेल्या लाल रुमालाला पुसत
होता..समोरच्या तंबाखुवाल्या सदाला केव्हाची भूक
लागली होती..भजे-जिलेबी बघून मन कातावत होतं..पण
बहुदा टकलावरच्या थेंबानी कढईत
मारलेली उडी त्याच्या लक्षात आली असावी म्हणुन गरम
झालेल्या बिसलरीतले दोन घोट बळेबळे त्याने
घशाखाली टाकले..
अफजलमामू 'पानssपानss' म्हणुन नागेलीच्या पानावर
पाणी शिंपून गिर्हाईक करत होता..मध्येच गोल टोपी काढून
डोक्यात आलेला घाम टोपीनेच टिपत होता..कांदे-बटाटे-
लसणवाले ठोक बेपारी गणीभाईने निवांत पुण्यनगरी चाळत
मध्येच मिल्टनच्या बाॅटलमधले थंडगार पाणी घशात
ओतले..व समोरुन गळ्यात पत्र्याची पेटी अडकवून पान -
तंबाखु,खर्रा,पुड्या इ.माल ठेवून चालत्या-बोलत्या
पानटपरीला म्हणजे माधाला हाळी देवून दोन
'कलकत्ता,ज्यादा तंबाखु,बारीक शुप्यारी,किमाम मारके'
पानाची ओर्डर देवून डोक पेपरात घुसवल..त्याचे चार-चार
नोकर गिर्हाईक करतांना घालमेलीस आलेले होते..
अशीच 'बेपारी' लाईन सोडून
पलिकडच्या शेतकर्यांच्या लाईनी होत्या..खताच्या
रिकाम्या पोत्यावर माल टाकलेला,काहींचा टोपल्यात वर पाल
नाही पण काहींच्या मोडक्यातोडक्या छत्र्या,काहींच्
या डोक्यावर फडके..व
तेलाच्या रिकाम्या झालेल्या पंधरा लिटरच्या कॅनला ओलं
फडकं बांधून जिवाचा बाजार सुरु होता..
लख्या..जेमतेम नऊ-दहा वर्षाच पोरगं..उन्हानं
म्हणा की जन्मतःच म्हणा,काळाठिक्कर चेहरा..कैक दिवसात
अंघोळ-तेलपाणी न मिळाल्याने राठ झालेले केस..हातापायावर
चा मळ दुरुनही स्पष्ट
लक्षात येईल इतका..अनवाणी..खाकी हाफपॅन्ट..मागून बरोबर
फाटलेली..करदोड्याने टाईट केलेली..शर्ट दोन्ही बाह्यावर
फाटलेला..आणि त्याच्यासारखाच मळका..डोळे सतत
भिरभिर..हातात कसलीशी एक
छोटी डब्बी...आणि अशा अवतारात ही मुर्ती अवघा बाजार
पायाखालून घालत होती..माय याच्या जन्मासोबत वर
गेलेली..एक मोठी बहिण गुदस्ता लग्न
झालेली..बिचारी मनासारखा हुंडा देता आला नाही म्हणून
गरीबाघरी पडलेली..अन लग्नाच कर्ज,अवकाळी पावसानं
खचलेल्या 'बा' दोन महिण्यापूर्वी फाशी घेवून 'मायला'
भेटायला गेलेला..याच्या बापाची उरलीसुरली दोन ऎकर
चुलत्यांनी कांगावा करून हडपलेली..त्यामुळे 'आपलं' म्हणावं
अस कुणी नसलेला हा 'लख्या' ,मिळेल तस खात,मिळेल तस
पित..जगत होता..
टोप्यावाल्या दुकानाशी येवून तो रेंगाळला..लाल,प
िवळ्या,पांढर्या किती मस्त दिसत होत्या..'मायला मोठं
झालो की मी बी यक घिन अशी..''मनातल्या मनात पुटपुटत
तो फोटोवाल्याच्या दुकानापुढे उभा राहिला..फोटोतल्
या निसर्गात,धबधब्यात,मोठ्ठ्या घरात तो हरवून गेला..''ऎ
चल रे.. हट उधर''..दुकानवाल्याचा आवाज
आला अन..त्याच्याकडे जळजळीत पाहत
तो पुढे,सरकला..खेळ
ण्याच्या गाडीवरची खेळणी पाहायला..तो अगदी जवळ
उभा राहीला...तो लहान हत्ती हातात घेणार तोच
दुकानदाराची काठी त्याच्या हातावर बसली..हात चोळत
''ह्याच्या मा...'' पुटपुटत तो निघाला..टरबुजवाल्याने फार
मोठा पाल लावला होता..दोन मिनिट तो तिथे स्थिरावला...हिर
वे हिरवे,गावरान टरबुज,महिकोचे सापासारखी नक्षी असणारे
संकरीत टरबुज...पाहूनच कसं थंडगार वाटत
होत...निघायची ईच्छा नव्हती पण थांबुनही काही साध्य
नव्हत..
फिरत फिरत तो पुढ चालत होता..पाय भाजून निघत होते..एक-
एक पाय लवकर लवकर उचलून तो त्यांना आराम देत
होता..गरमीने सगळं अंगाला खाज येत होती..
इतक्यात त्याच्या नाकात भजे आणि जिलेबीचा खमंग सुगंध
भरला..वासाचा शोध घेत तो रामकिसनच्या दुकानापर्यन्त
आला...बराच वेळ गोल गोल अढ्याची पाकात
भिजलेली जिलेबी..वेगवेगळ्या आकाराचे भजे बघून
त्याला कसनुसं होवू लागलं.. ''काय फायजे रं पोरा?''
रामकिसनच्या जबरी आवाजान तो दचकला..मानेनच 'काय
नाही' अस सांगितल..''मंग जाय की तिकडं..हिथ
का उभा ठाकलास..'?? रामकिसन डोळ्यांनी दटावत
म्हणाला..
लख्या जरा रामकिसनला दिसणार नाही अशा बेतात अलिकडे
आला..काहीतरी मनात ठरवल होत त्यान..तो फक्त योग्य
संधी बघत होता..इतक्यात एका लुगड्यावाल्या बाईन एक पाव
जिलेबी मागीतली..रामकिसनच्या बायकोने एक पाव
जिलेबी मोजून तिथेच जिलेबीच्या ताटात ठेवली..अन
पैशाची वाट पाहू लागली..म्हातारीने कमळाला हात घालत
कमरेची पिशवी काढली..अन इतक्यात लख्याने
वार्याच्या वेगाने येवून जिलेबीच पुडकं उचललं
नी जिवाच्या आकांतान पळायला सुरुवात केली..रामकिसनच्
या बायकोने गलका करताच भट्टीवर आडवा झार्या ठेवून
रामकिसन लख्याच्या पाठी धावला...
पण लख्या कसला गावतो..दुकानाच्या रांगा ओलांडत..धक्के
खात,धक्के देत...तो पळतच होता..शाळेच्या मागे
पळता पळता एक भली मोठी बाभळीची फांदी ओरबाडली व
ती चुकवायच्या नादात त्याचा तोल
गेला..तो नेमका शेजारच्या चिखलाच्या डबक्यात...पण
जिलेबीच्या पुडक्याला त्याने चिखलाचा स्पर्श होवू
दिला नाही...सगळा चिखलानं बरबटलेला...हातापायाचे कोपर-
ढोपर सोलून लख्या बाहेर आला...मागे कुणाचा मागमूस दिसत
नव्हता..
निवांत चालत तो शाळेजवळच्या हापशीवर आला..पुडकं
जवळच्या लिंबाच्या झाडाच्या सावलीत
ठेवलं...हापशी एकदा हापसून तो पटकन
धारेखाली बसायचा..खुप बरं वाटत होत..अगदी सगळा चिखल
निघून गेल्यावरही बराच वेळ त्याचा खेळ सुरु होता...
बर्याच वेळानंतर त्याला जिलेबीची आठवण झाली..पटकन
ऒलेत्या कपड्यानिशी धावत तो पुडक्याकडे
आला...पाहतो तो काय...लिंबाच्या थंडगार सावलीत
अर्धी अधिक जिलेबी खाऊन दोन
कुत्र्यांचा पुडक्यासाठी झोंबाझोंबी चालू होती..
उन्हाने आता चांगलाच जोर धरला होता...बाजार
जिवांना चांगलाच राबवून घेत फुलून आला होता..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
  9975767537