Showing posts with label मराठी गझल. Show all posts
Showing posts with label मराठी गझल. Show all posts

का इतके या जगण्याने टोकाला यावे..

| |

उचलून घ्यावे अन लगेच उधळून द्यावे..
का इतके या जगण्याने टोकाला यावे..?

कितिक परतून गेल्या दारावरून ईच्छा..
परिस्थितीने कितीवेळ उंबर्यात बसावे..?

कुठे कोवळ्या कणसाचा उरतो मागमूस..
प्राक्तन असते..उभ्या मनाने हुरडा व्हावे..!

पिक सावलीचे आता जर घ्यावे म्हणालो..
तर उन्हाच्या वादळाने 'आलोच' म्हणावे..!

-गणेश शिंदे,दुसरबीडकर...
9975767537

जगण्यासोबत समन्वयाची कला साधली नाही..!!

| |

जगण्यासोबत समन्वयाची कला साधली नाही..
जगून घेतो तरी जिंदगी जरी चांगली नाही..!!

ह्रदयावरुनी किती मोसमी वारे आले-गेले
एक सुखाची सर मुक्कामी कधी थांबली नाही..!!

जिथे झाड आंब्याचे व्हावे  तिथेच बाभुळ झालो.
नशिबामधल्या काट्यांची मग भिती वाटली नाही..!!

कुठल्याही कवितेच्या गावी जाणे जमले नाही..
आयुष्याची कविता शब्दांमध्ये  मावली नाही..!!

एका श्वासापासुन सगळे जीवन उसने असते..
तरी सत्यता कधीच तू माणसा मानली नाही..!!

-गणेश शिंदे,दुसरबीडकर..
९९७५७६७५३७

तुलाही हवी अन मलाही हवी.. (गझल)

| |

तुलाही हवी अन मलाही हवी..
जगायास थोडी नवी पालवी..!!

खरे सांग मी डाव खेळू कसा..
तुझी पावसा रे नियत पाशवी .!!

जमेना तुझ्याशी मला भांडणे..
मुळातच तुझे बोलणे लाघवी..!!

मला चंद्र मागू नये तू सखे..
इथे भाकरी भेटणे थोरवी..!!

किती बोलती भडभडूनी मला..
तुझे डोरले अन तुझी जोडवी..!!

किती काळ गेला अजुन शोधतो..
कुठे भेटते जिंदगी वाजवी..!!

जुने टाळणे सोड आता तरी..
नवी राहते गोष्ट कुठवर नवी..?? 

-गणेश शिंदे,दुसरबीडकर..
  ९९७५७६७५३७

शस्त्रसंधीचा कशाला??(गजल)

| |

पाहुनी जालिम विषारी माणसाची जात साली..
दंश करणे सोडुनी तो नागही करतो दलाली...!!

शस्त्रसंधीचा कशाला तू उगा धरतेस हेका..
जीवघेणे तीर आधी टाक डोळ्यातून खाली..!!

यार श्वासांची उधारी वाढली भरपूर आता..
अन किराणा जीवनाचा संपण्या सुरुवात झाली..!!

दाखले प्रेमातले मागू नको मजला सखे तू..
कागदे चुरगाळण्याचा नाद मज आहे मवाली..!!

केवढा होतो सुखाचा पाहुण्यासम सोहळा तो..
मग दुखाच्या का शिरावर वांझ असण्याची हमाली?? 

ह्याच गावावर किती रुसला कसा हा पावसाळा.. 
अन हवेने आणली नाही कधी साधी खुशाली..!!

सोडले रागावणे तेव्हा तुझ्यावर जीवना मी..
यार अगतिकता तुझी मृत्यूपुढे जेव्हा कळाली..!!

-गणेश उत्तमराव शिंदे...
दुसरबिड,बुलडाणा..
९९७५७६७५३७

कोठुनी शिकले असे हे विस्तवाने..(गजल)

| |


कोठुनी शिकलेअसे हेे विस्तवाने
आतल्या आतून जळते म पहाणे?

ताठ मानेने जरा जगण्यास गेलो,
मोडले मज 'ताठ' पाहूनी जगाने..!!

गंध आयुष्या तुझा कळल्यावरी मग,
सोडला हेका कसा बघ अत्तराने..!!

प्रेम नुसते वाटण्याची गोष्ट नाही..
जाणले तर स्वर्ग आहे,बघ मनाने..!!

वायदा दुःखासवे कुठलाच नाही..,
पण तरी हा सोबती असतो सुखाने..!!

भावनाही स्वस्त झाल्या फार आता
माणसांनी काढले बघ कारखाने..!!

दूर गेली फार तू कुठल्या कलेने? 
तोडणे अवघड मला अंतर शहाणे..!!

श्री 'गणेशा' तोच माझ्या जिंदगीचा,
घेतला बघ श्वास जेव्हा काळजाने..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

हे असे आभासवाणे(तरही गजल)

| |

तरही गझल
आदरणीय गजलकारा संगिताताई जोशी यांचा मिसरा
''हे असे आभासवाणे चांदणे आता नको..''
---------------------------------------
स्पंदनांची रेशमी तारांगणे आता नको..
(हे असे आभासवाणे चांदणे आता नको..!! )

साजरा कैफात करुया मीलनाचा सोहळा..
पण तुझे 'येते..!' असे ते सांगणे आता नको..!!

घे मना,आकार आता वर्तुळाचा तू जरा..
भावनांचे 'कोपर्याशी' भांडणे आता नको..!!

वादळाचे नेहमी येणे सुरू असतेच ना..?
त्यामुळे तर आणखी घर बांधणे आता नको..!!

श्वास कणसांना मिळो तू एवढे नक्की वहा.. 
उंच ताटांचे भुईवर रांगणे आता नको..!! 

एवढे तारूण्य गेले शोधण्या दैवास ह्या..
मान हलतांना तयाचे पांगणे आता नको..!!

रोज नयनी पावसाळा,हा उन्हाळा आणतो...
फार झाले या ऋतुंना सांधणे आता नको..!!

-गणेश शिंदे,
दुसरबिड,बुलडाणा..
9975767537

बाप नावाचे उडाले(गजल)

| |

बाप नावाचे उडाले मोसमी वार्यात छप्पर...
माय नावाचा किती मग सांडला पाऊस घरभर..!! 

केवढा जीवात तेव्हा जीव येतो काय सांगू..
तो कपाशीचा  दिसावा वाढतांना कोंब झरझर..!!

पावसा छळवाद का हा मांडतो तू माणसांचा..?
यायचे तर येत नाही,जात नाही जायचे तर..!!

रात्रभर बाहेर मी आलोच नाही हाय! दैवा..
अन सकाळी चांदणे संपून गेले यार तोवर..!!

संपुदे 'वनवास' देवा एकदा हा प्राक्तनाचा..
मग हवे तर 'राज्य'ही नाकारतो बघ मीच सत्वर..!!

झोप डोळ्यातील आता जाणवू दे ना जराशी..
जायचे आहे सकाळी 'नीज रात्री' तूच लवकर..!!

फार झाल्या आजवर चोर्या उगाचच ह्या कफल्लक...
भरजरी चोरी करू बघ काळजाची एक स्थावर..!!

-गणेश शिंदे...
-दुसरबिड,बुलडाणा..
-9975767537

शिवारगाथा (गझल)

| |

पाऊसलेखणीने जमिनीत काव्य कसतो...
कवितेत जिंदगीच्या तो एकरूप दिसतो..!! 

म्हणतात कैक आधी जोडी खिलार होती..
आता खुटा रिकामा दारी उदास हसतो..!!

सत्कार सोहळ्याला ज्याच्याकडून शाली..
बांधावरी बिचारा तो बोडखाच असतो..!!

नुसताच आसवांचा अंदाज बांधल्याने,
रोपास भावनेच्या बघ कोंब येत नसतो..!!

इतक्या सुरेल ताना घेऊ नकोस दुःखा..
हकनाक वेदनांचा येथे जमाव बसतो..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर
9975767537

माझ्या मनातले घर कोंदट... (मात्रावृत्त गझल)

| |

माझ्या मनातले घर कोंदट...
अन तू अख्खे घर धडधाकट...!!

तुझ्या प्रितीचे औषध व्हावे...
मरणावरी उतारा दसपट..!!

मौन तुझे मज बोलत असते..
व्यर्थ कशाला आदळआपट..!!

वसतिगृहावर मला सोडुनी..
हळवा होतो 'बाबा' तापट..!!

सुगी संपली स्वप्नांमधली..
मागे आठवणींचे धसकट..!!

असे जगू की तसे जगू मी...
आयुष्याची नुसती फरफट..!!

विहिर मनाची भरली नाही..
यंदा झाला पाउस हलकट..!!

डोळ्यामधले कळते तुजला..
उगीच का तू म्हटली...'चावट.'.!!

सुखाचीच पडझड झाल्यावर..
डागडुजी दुख करते दणकट...!!

तुझ्या पिकाचा बहर 'गणेशा'....
जाळत जावो सारे तणकट..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
९९७५७६७५३७

याद आहे..(गझल)

| |

यार नाही,प्यार नाही,फक्त झुरणे याद आहे..
तेच भागाकार आणिक शून्य उरणे याद आहे..!
कैकवेळा गायलो अन कैकवेळा ऎकले पण..
खास गाणी मैफलीची तीच स्फुरणे याद आहे..!
जिंदगीच्या फोडणीला भावनांचा जाळ आणिक..
वेदनेच्या लोणच्याचे मस्त मुरणे याद आहे..!
जीवघेण्या होत आहे रोजच्या त्या वंचना अन,
वल्गनेच्या ह्या शवाला फक्त पुरणे याद आहे..!

एवढीही खास नाही जिंदगानी (गझल)

| |

एवढी ही खास नाही जिंदगानी...
पण गळ्याला फास नाही जिंदगानी.!!
आकडेमोडीत नसतो खेळ सारा..
भूमितीचा तास नाही जिंदगानी..!! 
वाढता वय जाणले मर्मास मी ह्या..
सोडलेले श्वास नाही जिंदगानी..!!
रोज आभाळात मी कुठवर बघावे..?
चांदण्यांची रास नाही जिंदगानी..!!

पळपुट्या जखमा किती.. (मतलाबंद गझल)

| |

पळपुट्या जखमा किती मी सोसल्या देहावरी..
फक्त आहे ही इमानी काळजामधली खरी..!!

मानते मी धन्यता मज भेटला गजरा जरी..
मग कशाला चंद्र-तारे बोलशी काहीतरी..!!

लाजल्या नाही कधी जमिनीवरी येण्या सरी..?
ईश्वरा,काही फुले केलीस पण तू लाजरी.. !!

आपली आपण जरा राखून ठेवा पायरी..
नामयाच्या सारखी भेटेल नक्की पंढरी..!!

ऎनवेळी पावसा नाही बरी ही मस्करी... 
एकदा तू हो धरा, बघ काय जळते अंतरी..!!

कैकवेळा पार केली संकटांची मी दरी...
सांग मज नेशील ना आता सुखाच्या त्या घरी..?? 

सावलीसाठीच करतो मी उन्हाची चाकरी..
ईश्वरा सांभाळ माझी लेकुरे अन भाकरी..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

हे रोजचे तुझे बघ.. (गझल)

| |

हे रोजचे तुझे बघ,लटके रुसून जाणे..,
पाणावल्यावरी मी,हलके हसून जाणे..!!

तू चाळतेस माझे,पंचांग रोज सखये..,
आता तरी जमूदे,शुक्राचे फसून जाणे..!!

होतात का असे हे,आभास पावलांचे..,
आवाज पैंजनांचे,कानी ठसून जाणे..!!

आहे फितूर येथे,जन्मास लाभलेले..,
त्यांचे छळून जाते,सोबत बसून जाणे..!!

वक्तृत्व दूर आहे,माझ्यामधून मित्रा..,
तरिही सभेस कळते,माझे असून जाणे..!!

सरकार तेच टिकते,ज्यांना जमून येते..,
तोंडास ह्या प्रजेच्या,पाने पुसून जाणे..!!

मोहास टाळणेही,घ्यावे शिकून आता..,
वाटेवरी श्रमाच्या,कंबर कसून जाणे..!!

सोडून दूर गेली,माझीच सावली मज..,
अंधार याद देतो,तुझिये नसून जाणे..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर...

दार नाही लावले..(गझल)

| |

परत जातांना सुखाने,दार नाही लावले..,
हेरले तितकेच आणिक,त्या दुखाचे फावले..!!

मोह झाला कांचनाचा,कैकदा मज जीवनी..,
त्याचवेळी झोपडीने,ते 'कवडसे' दावले..!!

फाटक्या पदरास माझ्या,ह्या फुलांनी टाळले..,
वाट माझी पाहणारे,तेच काटे भावले..!!

रोजची ती देवपूजा,आज झाली सार्थकी..,
दूर करण्या दुःख माझे,'यम' मला हे पावले..!!

तू म्हणाली चांदणे दे,सिद्ध करण्या प्रेम हे..,
पाहता अंधार घरचा,मन उगाचच कावले..!!

सोडतांना गाव माझे,तू न मागे पाहले..,
श्रावणास पुरेल इतके,थेंब नयनी मावले..!!

लोप झाला संस्कृतीचा,देव झाला खेळणे..,
सोडले किर्तन बुवांनी,नर्तनाला धावले..!!

आम जनता पायपुसणे,राज्यकर्त्यांच्या घरी..,
लोकशाहीला कसे या,ढेकणांनी चावले..??

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..

बर्याचवेळा.. (गझल)

| |

भरल्या घरात रडणे,असते बर्याचवेळा..
भिंतीस दुःख हळवे,छळते बर्याचवेळा..!!

देठास हात लावू,कैसा तुझ्या फुला रे..?
नाते असेच अपुले,तुटते बर्याचवेळा..!!

ओठावरी जरासी,हलकेच शीळ येेता..;
मैना घरातली मग,खुलते बर्याचवेळा..!!

व्यापार पाहुनी हा,प्रेमात मांडलेला..;
काळीज फार सुर्या,जळते बर्याचवेळा..!!

त्रिज्या,परिघ वगैरे,असुदेत जिंदगीला..;
छेदून व्यास काही,निघते बर्याचवेळा..!!

खेळी कितीक वेड्या,करशील ईश्वराशी,,;
त्याला मनातले बघ,कळते बर्याचवेळा..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

जिजाऊगझल

| |

जिजाऊंच्या चारशे सतराव्या जयंतीनिमित्य
माता जिजाऊंच्या चरणी 'मातृतिर्थाचा रहिवासी'
ह्या नात्याने
माझी जिजाऊवंदना शब्दगझल स्वरुपात सादर समर्पित...!!
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

सिंदखेड तू केले पावन माय जिजाऊ..
शिकवलेस तू शिवबाला रण माय जिजाऊ..!!

सुर्यतेज ते उदरी जपुनी वाढवले अन,
जाहली स्वराज्याचे कारण माय जिजाऊ...!!

फिरवलास सोन्याचा नांगर या धरतीवर,
जिंकलेस तू रयतेचे मन माय जिजाऊ..!!

भावनेतही केली नाही कसुर जराशी,
तोडलेस माहेरा झटकन माय जिजाऊ..!!

चरणकमल तव 'निशिगंधाला' पुज्य सदाही..
या मनास लाभू दे तोरण माय जिजाऊ..!!

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
जय भवानी॥ जय जिजाऊ॥ जय शिवराय॥

-गणेश शिंदे,दुसरबिडकर
9975767537


मला का दिले तू... (गझल)

| |

मला का दिले तू तिचे भास देवा..?
मनाला उगा ही खुळी आस देवा..!!

मला दे किती ही कठिण जिंदगानी,
जरा भरवश्याचे असो श्वास देवा...!!

तुझ्या रोज ताटात नैवेद्य दिसतो..
कुठे मात्र मुश्किल कसा घास देवा..?

उरातुन हवा जोवरी खेळते ही..
शिडाला कळो वादळी त्रास देवा..!!

फुले माळरानी कशी रेखतो तू.. ?
असावा तुझा 'कुंचला' खास देवा...!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
  9975767537

वाटले आयुष्य हे...(गझल)

| |

वाटले आयुष्य हे काखेत होते..
शेवटी कळले वसाडे शेत होते..!!

हा व्यथांचा पावसाळा नेहमीचा..
वीज चमकावी तसे सुख येत होते..!!

जपत गेलो जिंदगीभर देह अवघा..
मग समजले 'यार हे तर प्रेत होते.'.!!

कोण 'मंबाजी' इथे आला असावा..?
केवढे काटे असे वाटेत होते...!!

वेळ गेला गोल करण्या भाकरीला..
अन निखारे तोवरी राखेत होते..!!

मन कधीचे फाटले..चिंध्या उडाल्या..
लोक देहाला दिलासा देत होते..!!

फोडुनी कातळ उगा का कोंब येतो..?
जीवनाचे हे खरे संकेत होते..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
  9975767537

गझल

| |

अशी पावसाळी,हवा आज आहे,
तुझ्या आठवांना,नवा साज आहे!

लपेटून घेतो,जरासा मला मी,
असा मैफलीचा,खरा बाज आहे!

इथे वेदनांना,शहारा असावा,
दिली शाल ज्याने,दगाबाज आहे!

तुझे गाव आता,मलाही नकोसे,
हवा सागराला,नवा गाज आहे!

उरी खोल काटा,मुखी गोड हासू,
जगावे कसे?हाच अंदाज आहे..!

अशा खोल रात्री,तुझा तूच सूर्य,
'गणेशा' तुझा हाच,आगाज आहे.!!

-निशिगंध(गणेश शिंदे,दुसरबिडकर©®)
:+919975767537

गझल:यार आलो...

| |

आताच काळजाला,लावून धार आलो,
कापायचे कुणाला,पाहून यार आलो.!

पाताळयंत्र कोणी,ज्यांना झुगारले मी,
त्यांनाच द्यायला हा,पाहूणचार आलो!

मी घेतलाच नाही,आधार गारद्यांचा,
माझ्याच माणसांचे,लेवून वार आलो.!!

खोटा बनाव केला,मोठा उठाव केला,
जाणून भेद त्यांचे,तोडून दार आलो.!!

जोतो बने कसाई,घेवून त्या सुरीला,
मोका बघून मी ही,पाहून चार आलो!!

बेदाग कोण अाहे,पाहूच आज येथे,
धुतल्याच कापडांचा,घेवून भार आलो!!

शोधू जरा म्हणालो,'सच्चा हिरा' परंतू,
'कच्चा हिरा' म्हणोनी,देखून गार आलो!!

आहे जरी असा मी,जात्याच फाटलेला,
आधार द्यावयाला,होवून 'खार' आलो!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
-निशिगंध(गणेश शिंदे,दुसरबिडकर©®)
:+919975767537