Showing posts with label मराठी कविता. Show all posts
Showing posts with label मराठी कविता. Show all posts

कशी बलावू रसाले...

| |

कशी बलावू रसाले
तुले सांग मायबाई..
तुह्या माहेराचा आंबा..
औंदा हसलाच नाही..!!

औंदा हसलाच नाही
मनासारखा पाऊस...
कशी होईल वं पुरी ?
काळ्या मायची हौस..!!

काळ्या मायची हौस
मिळो लेकराले दाणा..
इडा-पिडा जावो दूर
होवो पाऊस शहाणा..!!

होवो पाऊस शहाणा.. 
करो सम्दी आबादाणी..
दुष्काळाची धग जावो
फुलो हिरवी कहाणी..!!

फुलो हिरवी कहाणी..
पिक डोलत नाचावं..
भेगाळल्या भुईसाठी
फक्त इतकं मागावं..!!

-गणेश शिंदे,दुसरबीडकर.
9975767537

साॅक्रेटीस..(मराठी मुक्तछंद काव्य)

| |

मी स्वाभिमान पाजळतं
बहिर्यांच्या देशात
माझं...नशिब आजमावतोय..
मी..थोडासां जळतं..थोडा उजळतं..
अंधारभरल्य डोहात,
माझं एकटेपण सजवतोयं.!!

सकाळी अंधार झटकून अंगावरचा
ते..पुन्हा अंधार अंगावर घेइपर्यंत!
एक-एक वेडा जेव्हा समोर येतो
तेव्हा माझ्यातला साॅक्रेटिस जागा होतो..

अन..हाय..तेव्हाच समोरचा वेडा मला
माझ्यादेखतं मला वेडा बनवुन जातो..
हे तसं रोजचचं आहे....दोनचं कपडे...
आलटून पालटून घातल्यासारंख..
मनाला कधी चांगल तर....
कधी वाईट वाटल्यासारखं!!

खरंच.....कंटाळलोय आता..
गड्या आपला गाव बरा...
तिथली लोक,वेडा बनवत असली तरी...
त्यांचा स्वाभिमान पाजळतांना..
आपल्या स्वाभिमानाचं भान ठेवतात...
सुख नाही निदान दुःख तर वाटतांत...
माणुस म्हणुन रोज रोज नाही..
पण कधी कधी तर भेटतात ना??????

-गणेश शिंदे,दुसरबिडकर
9975767537

हरवला आहे...(मुक्तछंद)

| |

गावं तसं खुप वाढलयं......
नवे रस्ते..नव्या ईमारती
नवेचं लोक...नवी वस्ती
म्हणतात...पलिकडच्या अंगाला
कोण राहतं..कळतही नाही
कुणाच्या सुखदुखाला कुणी
फारसं कधी पळतंही नाही
इतकं वाढलयं गावं.........

मन कसे...तसे तसे..!!

| |

ओघळते खारे पाणी
गालाहुनी भलत्या क्षणी
आठवते असं कुणी
मनोमनी याद सुनी
नसलेले भास होती
दिसराती खास किती
रुसलेले श्वास देती
रिती रिती आस हाती
आज नसे तुझे हसे
मन दिसे वेडेपिसे
तुझे भासे जाणे असे
मन कसे....तसे तसे....!!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

मी ऎवढा खास नाही.. ( कविता)

| |

मी एवढा खास नाही..
कोवळा मधुमास नाही..
चंदनापेक्षा ही झिजलो..,
पण मला सुवास नाही.. !!

प्राक्तनातच हाल होते..,
फक्त भिजले गाल होते..
शोधता अस्तित्व माझे..,
तेही फक्त कंगाल होते..!!

फाटली स्वप्ने जराशी..
बाळगू किती ऊराशी..
वेदनेचे चांदणे का..,
हाक देई,ह्याच दारी?

फार झाला खेळ सारा..,
यातनांचा हा शहारा..
हे विधात्या,एकदा दे..
ताठ होण्याचा इशारा..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

हे सगळं तुलाही जाणवतयं..(मुक्तछंद)

| |

वेडी आहेस तू...
मनाच्या भिंती..
मुकाट आसवाने सारवतेस..
कळूही देत नाहिस...
आतल्या मातीचा वास..!
वादळी पाउस होतेस...
अन सगळ्यांना छत्री देतेस...
तुझं बरसणं जाणवुही देत नाहीस..!
चुलीतली धग मनात ठेवून..
वर बर्फाचा थंड गोळा होतेस..
कुडकुडत राहते एकटीच..,
तापला निखारा होवून..!
खर तर...,
सगळ्यानाच देते काहीना काही...
मग का डोळे याचनाशिल??
बदलत्या ऋतूच्या हिंदोळ्यावर..,
मनाला झुलवतेस...!
सोड ना यार...सगळचं ते..,
माहितेय मला....
हे सगळं तुलाही जाणवतयं...!!
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
- गणेश शिंदे,दुसरबिडकर..
  9975767537

गणाचे अभंग (अभंग)

| |

रातपंखाखाली
झोपलेला गाव,
जागा झाला घाव..
मनातला.. !!

वेदनांचा टाहो,
मावेना मनात..
सतत कानात..
घंटानाद.. !!

आयुष्य सुखाने
जगू देत नाही
मरू देत नाही
सुखासुखी..!!

ईश्वरा जरासा
घेरे बापा त्रास
लेकरांना घास
मिळो सदा.. !!

आयुष्या तुझी ही
रोजची उधारी..
माझी ही नादारी
सोसवेना..!!

खुप झाला वेळ
येईना तू कसा
मृत्यू भरवसा
तुटताहे..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

तुही पुरवू हावुस.. (मराठी ग्रामिण कविता)

| |

तुही पुरवू हावूस
राणी येवू दे पावूस..
मह्या मनाच्या शिवारा
नगं सोडून जावूस..!

रानं हपापेल हाये..
कहीपसून जिवाचं,
भेगाळल्या तनामंधी,
बी हे थांबेल कव्हाचं..!!

लय वर्स वर्स झाली,
गेली मिटना तहान..
ईहिरीच्या तळातला,
दिसे कातळ पहा नं..!!!

गेल्या सुन्या कैक सुग्या..
कोठारालं वास नाही..
भाकरीच्या भुकंलाही..
पोटभर घास नाही..!

देवा,लय झालं आता,
पोटासाठी अंत नगं,
जिंदगानी घे तू तुही..
मलं आता खंत नगं.. !!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

येतो म्हणतांना...(अष्टाक्षरी कविता)

| |

'येतो...' ..म्हणतांना...
पाऊल अडखळत
उंबरठाही थीजतो
निरोप घेतांना कसा
उगा चेहरा भिजतो...!!

निघत नाही सहसा
मग हातातला हात
सुटता सुटत नाही
कशी मिठीतली साथ..!!

डोळ्यात वाहत पाणी
काळजात खळबळ
नजरांना टाळूनही
पाहण्याची कळकळ..!!

जाववतं नाही अन
मागे पाहवतं नाही
दुराव्याचे क्षण असे
मग साहवत नाही..!!

'जपत रहा..स्वतःला.'
ओठ अडखळतात
सांगायचं खुप, पण
शब्दच अडकतात..!!

'येतो..'त्याचही तसंच
झर्रकनच वळतो..
पावसाळी डोळ्यांतून,
पार दिसेनासा होतो ..!!

खराच पाऊस आता
मुसळधार वाहतो..,
तीच्या,त्याच्या डोळ्यातच
मुक्काम करु पाहतो.....!!

आषाढातलां वैशाख
संपत नाही जोवर...
डोळ्यातले कृष्णमेघ
संपत नाही तोवर.....!!!!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर....
  9975767537

वर्ष सरलय बघ... (मुक्तछंद)

| |

वर्ष सरलयं..बघ पाहता पाहता,
वय निसटलय,वाहता वाहता..
तुला ऎकू येतात का??
वर्षभर घरात किणकिणनारी तुझी काकणं??
रिकाम्या डब्ब्यांची उगाच वाजणारी झाकणं??
वय वाढतयं..आपल्या संसाराच..दरवर्षी...
वय वाढतयं..आपल्यातल्या दुराव्याच..
दरवर्षी...
आपल्यातला जिव्हाळा खरतरं वाढायला हवा...
चार भिंतींनिही लळा खरतरं आपला ताडायला हवा...
तुझ्यासाठी आणलं नाही हक्कान काहीबाही...
पण म्हणुन माझी माया काही पातळ झाली नाही...
जाणवतेच ..
तू धुसफुसतेस माजघरात काही क्षणी...
अन तू मुसमुसतेस डोक्यावर पांघरून मनोमनी...
फक्त हात तुझ्या डोक्यावरून फिरवायचा राहून जातो..
डोळ्यातला भाव तुझ्या टिपायचा राहून जातो...
कसं सांगू..बाहेरचा ताण माझा घरी येतो..
तुला जवळ घेता घेता,दुसरा विचार उरी येतो..
गजरा-बिजरा रुचला नाही..आणायचा तुला..
तुझा कधी हट्ट नव्हता हेच आणा मला...
आता मात्र वर्ष गेलं...खुप काही कळतयं..
तुझ्या मनात शिरण्यासाठी काळिज मुकं जळतयं...
वाद झाले..शब्द तुटले..झालं गेलं विसरुन पुन्हा..
नवा जन्म..तुही घ्यावा.. मीही जन्मेन पुन्हा....!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

डोळ्यावरती झुलतं गाव (काव्य)

| |

डोळ्यावरती झुलत गाव,
ओठावरती तिचच नाव..
तिच्या सगळ्या पायवाटा,
मनामध्ये कोरल्या राव... !!
तिने फक्त वळून पहाव..
मीही नुसत उभं रहाव..
संभाषण नसल तरी..
ओळखीच स्मित द्याव....!!
♥♥♥♥♥♥♥
-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

वाढे उन्हाचा हा जोर (अष्टाक्षरी काव्य)

| |

वाढे उन्हाचा हा जोर
फुले आंब्याला मोहोर..
पान-पान झाडाखाली..
कोण टाकतो हा चोर..!!

गर्द रानात पळस..
दारी बोडखी तुळस..
भर ऊन्हाने चकाके..
तुझ्या मंदिरी कळस..!!

ढग हिरवे संपले..
झाले रस्ते फुफाट्याचे ..
शेत भयान उदास...
झाले वाळल्या काट्यांचे..!!

दिस संपता संपेना..
ओल कुठेच दिसेना..
कोमेजला मोगराही..
बघ सांजेला हसेना..!!

मनाभोवती सावली..
ऊन उतरता आली..
गर्दी आठवांची तुझ्या..
अवचित जमा झाली...!!

कसा लख्ख आठवला..
भिजलेला पावसाळा..
तुझ्या संगती सोबती..
गोड झालेला हिवाळा..!!

झळा पुरतील मला..
क्षणोक्षणी अशा आता..
शिकवेल जगण्याचे..
याद तुझी जाता-येता...!!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

गझल

| |

अशी पावसाळी,हवा आज आहे,
तुझ्या आठवांना,नवा साज आहे!

लपेटून घेतो,जरासा मला मी,
असा मैफलीचा,खरा बाज आहे!

इथे वेदनांना,शहारा असावा,
दिली शाल ज्याने,दगाबाज आहे!

तुझे गाव आता,मलाही नकोसे,
हवा सागराला,नवा गाज आहे!

उरी खोल काटा,मुखी गोड हासू,
जगावे कसे?हाच अंदाज आहे..!

अशा खोल रात्री,तुझा तूच सूर्य,
'गणेशा' तुझा हाच,आगाज आहे.!!

-निशिगंध(गणेश शिंदे,दुसरबिडकर©®)
:+919975767537

गझल:यार आलो...

| |

आताच काळजाला,लावून धार आलो,
कापायचे कुणाला,पाहून यार आलो.!

पाताळयंत्र कोणी,ज्यांना झुगारले मी,
त्यांनाच द्यायला हा,पाहूणचार आलो!

मी घेतलाच नाही,आधार गारद्यांचा,
माझ्याच माणसांचे,लेवून वार आलो.!!

खोटा बनाव केला,मोठा उठाव केला,
जाणून भेद त्यांचे,तोडून दार आलो.!!

जोतो बने कसाई,घेवून त्या सुरीला,
मोका बघून मी ही,पाहून चार आलो!!

बेदाग कोण अाहे,पाहूच आज येथे,
धुतल्याच कापडांचा,घेवून भार आलो!!

शोधू जरा म्हणालो,'सच्चा हिरा' परंतू,
'कच्चा हिरा' म्हणोनी,देखून गार आलो!!

आहे जरी असा मी,जात्याच फाटलेला,
आधार द्यावयाला,होवून 'खार' आलो!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
-निशिगंध(गणेश शिंदे,दुसरबिडकर©®)
:+919975767537

जरा टाक मागे...(मात्रावृत्त गझल)

| |

जरा टाक मागे,तुझ्या लोचनांना,
किनारा कधीचा,इथे थांबलेला..
बटांना तुझ्या दे,क्षणांचा विसावा,
बिचारा असा वात,भांबावलेला...!!

कळावा कळीला,ऋतूंचा शहारा,
खुलावे खळीने,कळी लाजतांना,
नको भार पेलू,मुक्या भावनांचा,
दवाचा दिसे थेंब,ऒथंबलेला..!!

मिळो वेळ थोडी,शहाण्या क्षणांना,
तुझा खेळ माझ्या,मनाने शिकावा,
हरावे-उरावे ,तुला पाहतांना.....,
मनाशी मनातून,मी दंगलेला..!!

पुन्हा वेच थोडी,फुले रातराणी,
तुझा गंध त्यांनी,उधारीत घ्यावा,
हसावे जरासे,फुलांनी,फुलूनी,
उगा देह होवून,गंधाळलेला....!!

असे काव्य माझे,तुला आठवावे..,
तुझ्या अंतरंगी,जरा साठवावे....,
तुलाही छळावा,असा एक पारा..,
तुझ्या भोवती जो,दिसे पांगलेला..!!!

-निशिगंध(गणेश शिंदे,दुसरबिडकर©®)
:+919975767537

गझल

| |

रात्र माझी झोपतांना,पाहतो मी,
आसवांना पाहतांना,वाहतो मी!

तीच होती,राजवर्खी,ओळ छोटी,
काळजाला छेदतांना,साहतो मी!

चांदण्यांनी शापलेला,चंद्र माझा,
ग्रासलेल्या लोचनांनी,सांधतो मी!

रोज चालॆ,खेळ माझा,प्राक्तनाशी,
वादळांना वेग थोडा,मागतो मी!

का छळावे,यातनांनी,माणसाला?
वाद नाही,फक्त थोडा कावतो मी!

भास आणिक शोष आता,मोप झाला,
रे 'गणेशा' हात यांना,दावतो मी!!
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
-निशिगंध(गणेश शिंदे,दुसरबिडकर)
:+9975767537

गझल..

| |

घे दिव्यांची,ऒळ हाती,रात आहे,
काजव्यांचा संपही,जोषात आहे!

प्राक्तनाची काळजी आहे म्हणोनी,
कैकदा कैफात तूही,जात आहे!

कोण आहे,साथ द्याया,भोवताली?
सावलीचा चेहरा का ज्ञात आहे!

दूर आहे,ऒळखीची,रातराणी,
न्याय मागे,फूल जे हातात आहे!

भैरवी बाकी,अजूनी चाल थोडा,
काळजाचा सूर ही साक्षात आहे!

हास थोडा,घे जगूनी,जिंदगी ही,
श्वास आहे,तोवरी ही,बात आहे!

वेळ जाता,वेळ येते,माणसाची,
फक्त थोडी,पाहिजे औकात आहे!
======================================
-निशिगंध(गणेश शिंदे,दुसरबिडकर©®)
:+919975767537

गझल:माझ्याच भावनांचा...

| |

माझ्याच भावनांचा,बेभान आज वारा,
वाचेल काय नौका,तूफान आज वारा!

वाटेत पाहतो मी,काटा शहारणारा,
भीतो असेच थोडे,सैतान आज वारा!

काळीजपाखराची,कैसी अता भरारी,
आभाळ पांघरूनी,नादान आज वारा!

बेजार होत आहे,ज्वाळा जरी मनाच्या,
लागेल आग ऎसी,अनजान आज वारा!

मी थांबलो,युगाचा,वाटे असे मनाला,
राखेल का जरासे,ईमान आज वारा?
××××××××××××××××××××××××××××××××××××××××××××××××
-निशिगंध(गणेश शिंदे,दुसरबिडकर©®)
:+919975767537

गझल:फुलपाखरावरी हा...

| |

फुलपाखरावरी हा,कसला ठराव झाला,
फुलण्याअधीच त्याचा,चढताच भाव झाला!

जगण्यास लागती का,फसवेच ते बहाणे?
भलत्याच कारणांचा,मजला सराव झाला!

ढळतात कैक राती,असवे मनात ऒली,
दिवसास जाळण्याचा,नकलीच डाव झाला!

हळव्या क्षणास ऎसे,जपले जरी उराशी,
हळ्याच वेदनांचा,हळवाच घाव झाला!

वय वाढता कळाले,सरकार काय आहे,
फडतूस माकडांचा,नुसता जमाव झाला!

बघ रोखलाच नाही,हटवाद तू अधाशी,
परक्याच भाकरीशी,तुजला लगाव झाला!

असवास पूर येता,घर वाहते मनाचे,
हसण्यास काफरांना,हलकेच वाव झाला!

असतात रे 'गणेशा',असले नवाब येथे,
सरताज राखणारा,बघ 'बाजिराव' झाला!
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
-निशिगंध(गणेश शिंदे,दुसरबिडकर©®)
:+919975767537

गझल:आरशाचा चेहराही...

| |

आरशाचा चेहराही,माणसाला टाळतो,
आतल्या खोट्या,मुजोरी,राक्षसाला टाळतो!!

येत-जाता आग लावी,जो शहाणा कैकदा,
पाहतो वरती नभा अन,पावसाला टाळतो!!

चोरट्याची वाच गाथा,बघ कळे मग काय ते,
रातचा हा खेळ म्हणोनी,तो दिसाला टाळतो!!

कर्ज घेता दोर येतो,अन गळ्याला लागतो,
याचसाठी हा कृषक त्या,कापसाला टाळतो!!

बापबेटे दौलतीने ,वेगळाले जाहले...,
यामुळे तर एक बाबा,वारसाला टाळतो!!

देशद्रोही वाढले बघ,घेच मित्रा,कार्य तू,
पाहतो मग देशसेवा,कोण साला टाळतो!!

'मी'पणाने अंत होतो,फार थोडे जाणती,
हा 'गणेशा'याच 'मी'च्या,साहसाला टाळतो!!
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
-निशिगंध(गणेश शिंदे,दुसरबिडकर)
:+919975767537