जय महाराष्ट्र (अभंग)

| |

धन्य महाराष्ट्र
धन्य कामगार
अजुनी बेजार
राज्य सारे... !!

सुराज्या चा ठेवा
शिवबाने दिला
सांभाळ जमेना
आम्हालाही..!!

संपलाच नाही
बिगारीचा काळ
नांगराचा फाळ
खांद्यावरी..!!

वैश्विक जाहले
'मालका'चे सुख
कामगार दुःख
तैसेची बा..!!

अजुनही हाल
कामगारा घरी
अजुनही दरी
संपेचना..!!

फुलावा फळावा
महाराष्ट्र सारा
शिवबाचा होरा
समजावा..!!

माणसा माणुस
ओळखता यावा
भेदाभेद व्हावा
तडिपार...!! 

आजच्या दिवशी
मागणेही हेच
काळजांचे पेच
दुर व्हावे..!!

जय महाराष्ट्र
जय शिवराय
कष्टकरी पाय
पुज्य व्हावे..!!

तमाम मित्रपरिवाराला महाराष्ट्र दिन,कामगार दिन आणि छत्रपती शिवराय जयंतीच्या शुभेच्छा..!!
॥जय महाराष्ट्र॥जय शिवराय॥जय कामगार॥

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

उपवास..(विनोदी)

| |

उपवास म्हटला की लगेचच पुलं आठवतात..हो पण माझा उपवास
पुलं च्या आसपास ही फिरकू शकत नाही.कुठे 'आयफेल'वरचे
पुलं आणि कुठं 'टिनशेड'मधला मी..असो ..पुलंच्या उपवासाच
कारण वेगळं होतं,माझा मात्र कारणांचा उपवास आहे..पुलं असते
तर त्यांच्यासोबत
लग्नाच्या पंगतीतही बसण्याची आपली औकात
नसती,लेखनपंक्तिची बात सोडाच..पण ऊगाच
मुलगा जसा बापाच्या शर्टाला धरुन मागेमागे जात असतो तसचं
मीही पुलं'बाबांचा अंगरखा धरून ,शेंबूड पुसत लिहिण्याचा पोटभर
प्रयत्न करेन.. पुलंचा उपवासाचा अन
माझ्या उपवासाचा 'विषय' जरी एक असला तरी 'आशय'
कुठेतरी वेगळा आहे,हे यथावकाश कळेलच आपल्याला....!!
''अहो..ऊठायचं नाही का आज,?आठ वाजून गेलेत..''
बायकोचा खणखणीत चिल्लर सांडल्यासारखा आवाज
आला अन मी दचकून पलंगावर ऊठून बसलो..'मी नाही..मी नाही''
बरळता बरळता बायको म्हणाली,'काहो?स्वप्नात माझ्या लपून
कुठले ऊद्योग चालू होते??'
तीच्या डोळ्यातला 'चटका'लागल्यावर पूर्ण शुध्दीवर
आलो..''अगं ,काही नाही,असचं आपलं..'' अन कसंनुस हसतं
उत्तरलो..'अहो,कलेक्टर ने आषाढी ऎकादशी ची सुटी 'डिक्लेर'
केली ते नुसत झोपायला का??मी हे विचारत होते की,आज
ऎकादशीचा उपवास करणार की,तुमच्यासाठी कुकर लावू??
बायकोला उत्तर देणार इतक्यात रोजच्या वरण
भाताच्या दुसर्या तागड्यात
मला साबुदाणा पोहे,चिप्स,बटाटे,रताळ्याचा खरपूस तूंप
टाकलेला शिरा,राजगुरा,दाण्याचे लाडू ई.ई.भरलेले आढळले,अन
साहजिकच फराळी यादीचं पारडं जड
झालं..मी मोठ्या भक्तीभावानं म्हणालो,''अगं
वेडे..अवघा महाराष्ट्र,अर्धा कर्णाटक अन अर्धा आन्ध्र
ज्या विठ्ठलाला भजतो,त्याचे आजच्या दिवशी गुणगाण
करतो,त्याच्यासाठी उपवास करतो,त्या 'सावळ्यासाठी' मी एक
दिवस उपवास केला तर बिघडलं काय??
बायकोला बहुदा माझ्या तोंडात जमा झालेली 'लाळ'
ऎव्हाना कळली होती..'बरं..बरं..'' असं म्हणून ती किचनकडे
वळाली..
मी घाईने ऊठलो,बाथरुम मधुन ब्रश व पेस्ट घेऊन 'पाकशाळेत'
गेलो..गॅसवर तेल पिऊन कढई बसलेली दिसली,हायसं
वाटलं..ब्रशवर पेस्ट घेतो न घेतो तोच झुरळ पाहिल्यासारखं
बायको किंचाळली,''ई...शि बाई..तो ब्रश आणि पेस्ट
ठेवा आधी..'' मला कळेचना,''अगं..काय झाल?
उपवासाच्या दिवशी भटजीबुवांनी दात
घासायची बंदी सांगितली का''? ''अहो..मी टिव्ही वर
बघितलयं,ब्रशचे केस प्राण्याचे असतात म्हणे,अन
पेस्टमध्येही हाडांचा चुरा मिक्स असतो''बायको दमात
ऊत्तरली...मला बायकोच्या तर्कशास्त्राचा हेवा वाटला..मी
म्हणालो..'वेडे..ते रंगवायचे ब्रश असतात,आणि पेस्टमध्ये काय
टाकतात हे बघणारी तू काय,'क्वालिटी कन्ट्रोल मॅनेजर' आहेस
का?? 'ते मला,कळतं नाही,तेलाल दंत मंजन आहे,आज त्याने
दात घासा'' तीने निर्णय जाहिर केला..'मग
यातही विटांचा चुरा असतो म्हणे'' मी खोचक
बोललो..''असेना का,विटा शाकाहारी आहे,अन तसही आज
'विटेचाच' मान आहे,घ्या मुकाट्याने''..आज दिवसभर
तीला किचनमध्ये त्रास द्यायचा असल्याने मी निमूटपणे
हा त्रास सहन करत होतो...
शुचिर्भूत होवून बातम्या घेत
असतांना,बायको आली..'अहो,निदान आज तरी थोडा 'हरीपाठ'
वाचावा माणसाने,सकाळी सकाळी''..मला झिणझिण्या आल्या,''अगं
बाई..मी काल रात्रीपासून काही खाल्लेल
नाही,उपासीपोटी कुठलही युद्ध जिंकता येत नाही,अन
देवालाही ते आवडतं
नाही..जा थोडासा बदामशिरा कर,मोठी प्लेटभरून..बाकी नंतर
सांगेन..'' माझा रवैय्या पाहून बायको,हळूच कानात
पुटपुटली...''आपलं पोट बघितलं का??
त्या कोपर्यावरच्या 'नटमोगरी' सारखं दिसते आहे,अन म्हणे
युद्ध,अन उपाशी'' तशी ती तनतनत किचनमध्ये गेली.. म्हणजे
एक गोष्ट मला कळाली होती..'नटमोगरी'ला दिवस
गेलेत..माझ्या पोटावरून हात फिरवत मी अंदाज बांधला..म्हणजॆ
तिसरा महिना..तरिच म्हटलं..अशात जरा नटमोगरी 'बेढब'
कशी दिसतेय.. ..:-)  :क्रमश:

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
  9975767537

हे रोजचे तुझे बघ.. (गझल)

| |

हे रोजचे तुझे बघ,लटके रुसून जाणे..,
पाणावल्यावरी मी,हलके हसून जाणे..!!

तू चाळतेस माझे,पंचांग रोज सखये..,
आता तरी जमूदे,शुक्राचे फसून जाणे..!!

होतात का असे हे,आभास पावलांचे..,
आवाज पैंजनांचे,कानी ठसून जाणे..!!

आहे फितूर येथे,जन्मास लाभलेले..,
त्यांचे छळून जाते,सोबत बसून जाणे..!!

वक्तृत्व दूर आहे,माझ्यामधून मित्रा..,
तरिही सभेस कळते,माझे असून जाणे..!!

सरकार तेच टिकते,ज्यांना जमून येते..,
तोंडास ह्या प्रजेच्या,पाने पुसून जाणे..!!

मोहास टाळणेही,घ्यावे शिकून आता..,
वाटेवरी श्रमाच्या,कंबर कसून जाणे..!!

सोडून दूर गेली,माझीच सावली मज..,
अंधार याद देतो,तुझिये नसून जाणे..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर...

दार नाही लावले..(गझल)

| |

परत जातांना सुखाने,दार नाही लावले..,
हेरले तितकेच आणिक,त्या दुखाचे फावले..!!

मोह झाला कांचनाचा,कैकदा मज जीवनी..,
त्याचवेळी झोपडीने,ते 'कवडसे' दावले..!!

फाटक्या पदरास माझ्या,ह्या फुलांनी टाळले..,
वाट माझी पाहणारे,तेच काटे भावले..!!

रोजची ती देवपूजा,आज झाली सार्थकी..,
दूर करण्या दुःख माझे,'यम' मला हे पावले..!!

तू म्हणाली चांदणे दे,सिद्ध करण्या प्रेम हे..,
पाहता अंधार घरचा,मन उगाचच कावले..!!

सोडतांना गाव माझे,तू न मागे पाहले..,
श्रावणास पुरेल इतके,थेंब नयनी मावले..!!

लोप झाला संस्कृतीचा,देव झाला खेळणे..,
सोडले किर्तन बुवांनी,नर्तनाला धावले..!!

आम जनता पायपुसणे,राज्यकर्त्यांच्या घरी..,
लोकशाहीला कसे या,ढेकणांनी चावले..??

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..

बर्याचवेळा.. (गझल)

| |

भरल्या घरात रडणे,असते बर्याचवेळा..
भिंतीस दुःख हळवे,छळते बर्याचवेळा..!!

देठास हात लावू,कैसा तुझ्या फुला रे..?
नाते असेच अपुले,तुटते बर्याचवेळा..!!

ओठावरी जरासी,हलकेच शीळ येेता..;
मैना घरातली मग,खुलते बर्याचवेळा..!!

व्यापार पाहुनी हा,प्रेमात मांडलेला..;
काळीज फार सुर्या,जळते बर्याचवेळा..!!

त्रिज्या,परिघ वगैरे,असुदेत जिंदगीला..;
छेदून व्यास काही,निघते बर्याचवेळा..!!

खेळी कितीक वेड्या,करशील ईश्वराशी,,;
त्याला मनातले बघ,कळते बर्याचवेळा..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

मी ऎवढा खास नाही.. ( कविता)

| |

मी एवढा खास नाही..
कोवळा मधुमास नाही..
चंदनापेक्षा ही झिजलो..,
पण मला सुवास नाही.. !!

प्राक्तनातच हाल होते..,
फक्त भिजले गाल होते..
शोधता अस्तित्व माझे..,
तेही फक्त कंगाल होते..!!

फाटली स्वप्ने जराशी..
बाळगू किती ऊराशी..
वेदनेचे चांदणे का..,
हाक देई,ह्याच दारी?

फार झाला खेळ सारा..,
यातनांचा हा शहारा..
हे विधात्या,एकदा दे..
ताठ होण्याचा इशारा..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

हे सगळं तुलाही जाणवतयं..(मुक्तछंद)

| |

वेडी आहेस तू...
मनाच्या भिंती..
मुकाट आसवाने सारवतेस..
कळूही देत नाहिस...
आतल्या मातीचा वास..!
वादळी पाउस होतेस...
अन सगळ्यांना छत्री देतेस...
तुझं बरसणं जाणवुही देत नाहीस..!
चुलीतली धग मनात ठेवून..
वर बर्फाचा थंड गोळा होतेस..
कुडकुडत राहते एकटीच..,
तापला निखारा होवून..!
खर तर...,
सगळ्यानाच देते काहीना काही...
मग का डोळे याचनाशिल??
बदलत्या ऋतूच्या हिंदोळ्यावर..,
मनाला झुलवतेस...!
सोड ना यार...सगळचं ते..,
माहितेय मला....
हे सगळं तुलाही जाणवतयं...!!
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
- गणेश शिंदे,दुसरबिडकर..
  9975767537