काव्याग्रह:एक वसा कवितेचा..!! (रसग्रहण)

| |

'ओल्या दुखर्या जखमा जाळणारी
तू गुणकारी मलम आहेस..!
कल्पनेच्या कल्पवृक्षावर कवीनं
बांधलेलं गंधवेड्या चंदनाच
कविते..तू कलम आहेस...!!.. '
विष्णू जोशी संपादीत 'काव्याग्रह'चा ७ वा अंक अर्थात वृक्ष, ह्याच नितळ नि तरल भावनेने रसिकांच्या हाती पडतो..अन मनाचा ठाव कधी घेतो,कळतंही नाही..!!
सहा जाणकार समिक्षकांच्या नजरेतून भावलेले कवी,त्यांच्याशी नकळतपणे होणारी ओळख, तिन सुंदर काव्यात्म लेखांचा काळजापुढे पेश होणारा नजराणा,स्वतःची 'वेगळी ओळख' पटवून देणारे तीन कवी,वसंताने सर्व सृष्टीला आपल्यातला बहर प्रदान करावा तसे स्वतःच्या लेखणीतून फुललेल्या १६ कविंचा 'वसंतोत्सव'..आणि इतक्या सार्या गोष्टी आपल्या हाती देवून तृषार्त झालेले संपादक नि त्यांच 'शाईचे गणगोत'...!!
'काव्याग्रह'चा सातवा अंक अस्सल कविर्हद्यासाठी खुप दौलत घेवून आलेला आहे..!
ह्या 'वृक्षा'चं कुठलही 'पान' वाचायला घ्या मनातली कविता तिथूकच उमलायला सुरुवात होते.मुखपृष्ठापासून सुरु केलं तर प्रशांत असनारे ह्यांची 'कोळी आणि कविता' 'वाह' म्हटल्याशिवाय पुढे जावू देत नाही.
विरधवल परब यांच्या लेखणीतून उषा परब ह्यांच्या 'तिच्या आभाळालातील' स्त्रीवादी कविता काळजाला भिडतं राहतात.पुरुष म्हणून कुठेतरी खोल विचार करायला लावतात.पी.विठ्ठल,शशिकांत हिंगोणेकर ह्यांच्या एकून ४+८ कवितांचा खजाना 'काव्याग्रह' आपल्यापर्यन्त 'पोचवतो'. पी.विठ्ठल ह्यांच्या 'किंवा कल्पना करा की आपण..' 'इतिहास' किंवा 'श्रद्धांजलीचे मौन पाळतांना' ह्या कविता वाचता वाचता माणसाला अंतरमुख करतात. शशिकांतजी हिंगोणेकरांच्या कविताविषयी काय बोलावं??वाचल्यानंतर निश्चितच त्यांच्या कविताच आपल्यासोबत संवाद साधतात.
'गंध शिवाराचा' सदरात ज्येष्ठ साहित्यिक बाबारावजी मुसळे ह्यांनी आजच्या पिढीचे कवी,अनुवादक पृथ्वीराज तौर ह्यांच्या 'गाव आणि शहराच्या मधोमध' चे केलेले रसग्रहण हे कदाचित संग्रहाचं विशेष असावं.काळीज कुरतडत,मन अस्वस्थ करतांना नव्या आशेच्या अभ्युदयाची स्वप्ने दाखवणार्या पृथ्वीराजजींच्या कविता आपल्याही मनाला प्रश्न करतात की 'आपण नेमके कुठले??'
नागराज मंजुळे हे एक चांगले कविदेखिल आहे,ही ओळख मला 'काव्याग्रह'तूनचं झाली.त्यांच्या 'उन्हाच्या कटाविरुद्ध'  ह्या पुस्तकातल्या कवितांशी मनोज मुनेश्वर ह्यांनी करुन दिलेली ओळख न विसरण्याजोगीचं...! वाशिमच्या भुमीतले कवी दिपक ढोले यांच्या 'चेहरे ओरबाडलेल्या देशात' या पुस्तकाचं,ज्येष्ठ साहित्यिक.सदानंदजी  सिनगारे ह्यांच्या खास शैलीतलं समिक्षणही वाचनीय झालेले आहे.
'दिपु' च्या अनघड तितक्याच आशयसंपन्न कवितांचा रणधीर शिंदे ह्यांच्या 'दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची कविता' ह्या पुस्तकाचा रविकांत शिंदे ह्यांनी घेतलेला आढावा,'रक्तसेतू' ,'अग्निशाळा' इत्यादी पुस्तकांच्या गाठीभेटी,राज मेहर यांचा 'पत्थरातल्या काळीजकळा' सगळं सगळं अगदी वाचनाची भूक भागविणारे आहे.
यावेळच्या 'काव्याग्रह'तून मोहन शिरसाठ,रमजान मुल्ला,विनय दांदळे,संदीप काळे,इरफान शेख,अभिषेक उदावंत,फुला बागुल,वीरा राठोड,विनोद मोरांडे,रविंद्र देवरे,नजीम खान,मेघराज मेश्राम,लवकुमार मुळे इत्यादी कविंच्या कविता भेटायला येतात अन मनात मुक्काम करून राहतात..!!
विष्णू जोशी,त्यांचे कविमित्रमंडळ,आणि पाठबळ देणारे कैक हात ह्यांच्यासारख्या कवितेला वाहून घेतलेल्या माणसांमुळेच कविता आणि काव्याग्रह मनोमनी फुलत आहे.व तो निरंतर फुलतं राहणार आहे.अंक एकदा वाचून भूक भागत नाही,पुन्हापुन्हा उघडून वाचावासा वाटणे हेच काव्याग्रह चं खर यश आहे..!!
प्रत्येकाच्या संग्रही असायलाच हवा इतकं अंकाच वेगळेपण ठळक आहे.जास्तीत जास्त कविता रसिकांनी,कवितेचं हे रोपटं आभाळापार नेण्यासाठी अंकाचे नियमित वर्गणीदार व्हावे,आर्थिक मदतीसाठी आपल्या जवळपासच्या जास्तीत जास्त जाहिराती देण्याचा प्रयत्न करावा.कारण उपाशीपोटी कुठलंही युद्ध जिंकल्या जात नसतं..आणि कवितेचा वसा स्विकारायचा म्हटल्यावर आर्थिक प्रश्नही असतातच.त्यांनाही तत्परतेने सोडवणे क्रमप्राप्त असतेच..तुमच्या आमच्यासारख्याच्या खारीच्या वाट्याने हा अंक पुढेही दर्जेदार होईल,ह्यात शंका नाही..!
विष्णु जोशी ह्यांचा हा कवितेच्या अश्वमेधवारू चौखूर पसरू देत..त्याला रसिक मायबापांच उदंड पाठबळ मिळू देत..!!
मनपुर्वक शुभेच्छा..!!

काव्याग्रह
संपादक विष्णू जोशी,
डाॅ.घुनागे हाॅस्पिटलमागे,
मुख्य पोस्ट ऒफिससमोर,
वाशिम,ता.जि.वाशिम-४४४५०५
मो.९६२३१९३४८०,९८६०२२१८४२

-गणेश उत्तमराव शिंदे
दुसरबिड,बुलडाणा
९९७५७६७५३७


तू गेल्यावर..(गझल)

| |

तू गेल्यावर पक्के घर नुसते कोसळते..
आधाराला कोणी नसले की मन छळते..!!

राहू दे ना हात घडीभर स्वप्नांभवती..
'अंगण झाडायाचे आहे' मजला कळते..!!

वापरतो तू कुठले अत्तर सांगत जा रे..
धरतीवर तू कोसळतांना जग दरवळते..!!

मी नसले की वार्यावरती लक्ष असू दे..
आठवणींच्या पानोपानी मी सळसळते..!!

बांधावरचे सुकले होते झाड जरासे..
त्याला कळले जमिनीमधले दुःख तरळते..!!

प्रत्येकाचे 'घर कौलारू' सुंदर नसते..
अंदर गेल्यावर कळते,छप्परही गळते..!!

आयुष्याची भाकर साला चन्द्र नसावा..
ते तर नक्की सुर्याइतके सत्य उजळते..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर...