माझ्या मनातले घर कोंदट... (मात्रावृत्त गझल)

| |

माझ्या मनातले घर कोंदट...
अन तू अख्खे घर धडधाकट...!!

तुझ्या प्रितीचे औषध व्हावे...
मरणावरी उतारा दसपट..!!

मौन तुझे मज बोलत असते..
व्यर्थ कशाला आदळआपट..!!

वसतिगृहावर मला सोडुनी..
हळवा होतो 'बाबा' तापट..!!

सुगी संपली स्वप्नांमधली..
मागे आठवणींचे धसकट..!!

असे जगू की तसे जगू मी...
आयुष्याची नुसती फरफट..!!

विहिर मनाची भरली नाही..
यंदा झाला पाउस हलकट..!!

डोळ्यामधले कळते तुजला..
उगीच का तू म्हटली...'चावट.'.!!

सुखाचीच पडझड झाल्यावर..
डागडुजी दुख करते दणकट...!!

तुझ्या पिकाचा बहर 'गणेशा'....
जाळत जावो सारे तणकट..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
९९७५७६७५३७