कशी बलावू रसाले...

| |

कशी बलावू रसाले
तुले सांग मायबाई..
तुह्या माहेराचा आंबा..
औंदा हसलाच नाही..!!

औंदा हसलाच नाही
मनासारखा पाऊस...
कशी होईल वं पुरी ?
काळ्या मायची हौस..!!

काळ्या मायची हौस
मिळो लेकराले दाणा..
इडा-पिडा जावो दूर
होवो पाऊस शहाणा..!!

होवो पाऊस शहाणा.. 
करो सम्दी आबादाणी..
दुष्काळाची धग जावो
फुलो हिरवी कहाणी..!!

फुलो हिरवी कहाणी..
पिक डोलत नाचावं..
भेगाळल्या भुईसाठी
फक्त इतकं मागावं..!!

-गणेश शिंदे,दुसरबीडकर.
9975767537

का इतके या जगण्याने टोकाला यावे..

| |

उचलून घ्यावे अन लगेच उधळून द्यावे..
का इतके या जगण्याने टोकाला यावे..?

कितिक परतून गेल्या दारावरून ईच्छा..
परिस्थितीने कितीवेळ उंबर्यात बसावे..?

कुठे कोवळ्या कणसाचा उरतो मागमूस..
प्राक्तन असते..उभ्या मनाने हुरडा व्हावे..!

पिक सावलीचे आता जर घ्यावे म्हणालो..
तर उन्हाच्या वादळाने 'आलोच' म्हणावे..!

-गणेश शिंदे,दुसरबीडकर...
9975767537