सये...तुझ्याविना...(कविता)

| |

सये तुझ्याविना जीव कासाविस होई.
जशी कोपर्यात ऊभी,अबोल जाईजुई.  

भासे पावलोपावली,तुझ्या वीरहाच्या खुणा,
जसा पुनवेचा चांद ऎकाकी, चांदण्याच्या विना. 
           
सय दाटते मनात, तुझी एकांताच्या क्षणी
मग शोधतो तुला मी, ऎकटाच मनोमनी.

आता येतिल का ते दिस,तुझ्या शब्दानी भारलेले?
सये,तुझ्याविना मला जणू,मेलेल्याला मारलेले.

तुझा ऎक ऎक श्वास,माझ्या श्वासात अडखळे,
श्वास धरावयां जावं,श्वास पुढे पुढे पळे...

तुझ्या सयेत सये,उभा जन्म सरणारं..
ऎकला होतो मी,अखेर ऎकलाच ऊरणार!!  

-निशिगंध (गणेश शिंदे,दुसरबिडकर)®

एक मैफल..विटलेली....

| |

दुरावले माझे गाणे
दुरावले माझे सूर
मैफिलीला रंग नाही 
ती विराणी दूरदूर. ..!! 

काळजाच्या नक्षत्रांना 
काजळी कशी हि आली?
आठवांच्या अवर्षणी
पापणी अशी का ओली?  

चंन्द्र आता ग्रासलेला
माझ्या कसा अंतरंगी....?.
इन्द्रधनू बेरंग नी
बघ दाह होतो अंगी...! ! 

ओळखीचा शब्द शब्द
मला ओळखेना झाला ..
एकेक करुन सारा..
हा संसार दुर गेला. ..!! 

ओठ माझे स्तंभलेले
शब्द माझे थांबलेले
उसळते रक्त माझे
ते ही आता सांडलेले..!! 

आता फक्त भारवाही
देह वाहतो पसारा ... 
अनोळखी संसार नी
फक्त ओळखीचा वारा...!! 

गोठलेल्या लोचनांनी
मिटलेल्या पापण्यांनी ..
साथ मज दिली फक्त,
आभाळाच्या पाखरांनी. ..!! 

मग..एकदा असेच...
आयुष्यमौन सरेल ..
देहाची राख विरेल..
न सुटणारे ते कोडे.. 
मग सहज सुटेल..!!!  

-निशिगंध (गणेश शिंदे,दुसरबिडकर)®