हळवे कधीच नव्हते..(गजल)

| |

हळवे कधीच नव्हते,आभाळ हे मवाली..
झाले असेल त्याचे अलवार दुख अकाली..!!

घनगर्द सावलीशी नाते कधीच नव्हते..
फिरलो उन्हात तेव्हा ओळख जुळून आली..!!

पोटात भूक आणिक म्हणतो नको नको मी,
मुल्ये जगावयाची गरिबीतही कळाली..!!

बुद्धीबळातले मी नाही मुळीच प्यादे..
बांधून ठेवलेल्या आधीच ज्यास चाली..!! 

डोळ्यातले नको तू,टाकू पुन्हा तरल मिठ..
भाजी समन्वयाची खारट बरीच झाली..!! 

अडवू नको पिकांचे तू एवढ्यात पाणी..
त्यांची 'तहान' देवा आहे तुझ्या हवाली..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर ..
9975767537

तू येण्याच्या आधी काही तू गेल्याच्या नंतर...

| |

तू येण्याच्या आधी काही तू गेल्याच्या नंतर..
सखये मी मग मोजत बसतो दोघांमधले अंतर..!! 

सोपे नसते.कळले..!आयुष्याचे चंदन होणे..
वेढा घालुन बसलेला प्रश्नांचा नाग निरंतर..!!

येता-जाता 'तो' डोकावत असतो  विहिरीपाशी..
'भरल्या' विहिरीतुन नक्की जगण्याचा मिळतो मंतर..!!

सारवलेली मायेने स्वप्ने शेणा-मातीची..
फरशीवर त्यांना 'पुसण्या'वाचुन नाही गत्यंतर..!!

कृष्णाला पाहुन त्या पुतनेलाही फुटला पान्हा..
मग का आजमितीच्या कैक यशोदांचे स्थित्यंतर..??

-गणेश शिंदे..
दुसरबिड,बुलडाणा...
9975767537

हा देहाचा सुर्य कलू दे..(गजल)

| |

हा देहाचा सुर्य कलू दे..
आयुष्याची सांज ढळू दे..!!

इतके प्रेमळ बनव मला की ..
मी मेल्यावर दुःख रडू दे...!!

हळहळणार्या तुळशीलाही..
मुसमुसते अंगण समजू दे ..!!

काच मनाची कणखर व्हावी..
ओरखडेही 'नरम' पडू दे..!!

हट्ट मुलाचे पुरवत असता...
'माझे बाबा' परत कळू दे..!!

दे सुख नावाचे तणनाशक ..
बहर मिळू दे दुःख जळू दे..!!

-गणेश शिंदे..!!

फिनिक्स..(कविता)

| |

शब्द फुलतांत अन
वाटा अडतातं ...
नकोनकोशी कारणे
येवुन भिडतातं..
खुप वाटतं मनांतून
आकाशाला गवसणी घालावी...
पण आयत्या वेळी ना
बघ कसे पंख तुटतात..
मी खरंच.. फिनिक्स नाहीये..
राखेतुनही वर यायला..
मग काय??
बापडे शब्द,तीच राख
अंगावर घेऊन,आयुष्य कंठतात!!

-गणेश शिंदे
दुसरबिड,बुलडाणा..
9975767537

अनवाणी पावलांनी(मराठी कविता)

| |

अनवाणी पावलांनी एकदा
टाकावचं ऎखांद पाऊल
कळायला हवी कधीतरी
काट्याकुपाट्यांची चाहुल
अनवाणी पावलांनी कधी
निखार्यावरही चालुन पहावं
हे ही नाही पटलं तर
स्वैर पाण्याबरोबर वहावं
अनवाणी पावलांनी मग
जिंकावी आकाश नी धरती
मरणालाही जिंकून मग
खुशाल जावं वरती....!!

-गणेश शिंदे..
दुसरबिड,बुलडाणा
9975767537

सहजचं..

| |

आपल्याला ते आवडावेतं
ज्यांना आपण आवडतो...
नाहीतर निरर्थक गोष्टींसाठी,
आपण व्यर्थ आयुष्य दवडतो.
भावनांच्या भरात ऊगाच
हातंच सोडायला बघतो
अन पळणांर निसटून गेलं की,
परत हातंच्या मागं निघतो...
आयुष्य नेहमींच सुंदर होतं...सुंदर आहे..
थोडंस अॅडजस्ट केलं ना.. की,
खुशियो का समंदर आहे!!!

-गणेश शिंदे, दुसरबिडकर©®
9975767537

प्रश्न (मराठी कविता)

| |

मी फिरतोय..गरागरा..
एखाद्या सिलिंग फॅन सारखा..
पण अजुनही..हवं ते उत्तर मिळतं नाही...
..अन मिळणारही नाही..कदाचीत..
उत्तराची अपेक्षा तरी कोणाकडुुन???
अर्थात..माझ्याकडूनंच!
ज्याचा प्रश्न,त्याला उत्तर माहीत असतं....अस
म्हणतात.
..पण मात्र सगळ्याच वेळी नाही...
माझा नुसता प्रश्नचं जन्माला आला...
तो उत्तर घेऊन आलाचं नाही..
मग..,त्या अपेक्षीत उत्तराची कुठवरं वाट पहायची??
कधी?का?कुठवरं?आजन्म?
की मरेपर्यन्त?
की सगळे भोग सरल्यावर??
सगळे नुसते,प्रश्न अन प्रश्न..
विनाउत्तरांचे..
मनाच्या भासाचे की विरोधाभासाचे???
उत्तर मिळण्यात काय साध्य होईल?? माहीत नाही...
कदाचीत..काहीच नाही...
का?असं होवु शकत नाही का??
की,प्रश्नकर्ताचं प्रश्नासहीत ..संपून गेला तर??
ते सगळे प्रश्नचं नाही तर....
( उत्तराची अपेक्षा करण्याचा 'प्रश्नचं नाही...)

-गणेश शिंदे...
दुसरबिड,बुलडाणा
9975767537

सल..(मराठी कविता)

| |

नाही पुनवेचा चांदवा..निदान..
सुखाच्या चांदणीनं तरी...
आयुष्याजवळ सरकावं....
नाही सुर्याचा लख्ख प्रकाश..निदान..
एखाद्या काजव्यानं तरी..
जरासं जवळून फिरकावं....!!
संदर्भ बदलत जावे..पण..
आशय नेमका तोच रहावा..
कायदे अन वायदे..बदलावेत..आयुष्याचे..
पण..निश्चय नेमका तोच रहावा..!!

-गणेश शिंदे
दुसरबिड,बुलडाणा
9975767537

रोज... (कविता)

| |

रोज कितितरी माणसं भेटतात..
काही चांगली..काही वाईट..
काही दोहोंचा सुवर्णमध्य...
काही क्षितिज फाडून..
आभाळ कवेत घेणारी...
काही काळीज फाडून..
आबाळ करणारी...
काही ओळख नसतांना..
ओंजळी भरभरुन रिती करणारी...
काही ओळखीचा फायदा घेऊन..
त्यांची झोळीआपल्या ओंजळीनं भरणारी...
हम्म...असो...!!!

-गणेश शिंदे
दुसरबिड,बुलडाणा
9975767537

पुन्हा एकवार..(कविता)

| |

पुन्हा एकवार...
*********
पुन्हा एकवार.....
मेंदीभरले हात हातात आले
अर्धोन्मिलीत नयनांचे देणेघेणे झाले
निळ्या आभाळाला फिरुन एकवार
धरतीचे अनामिक देने मिळाले
************
पुन्हा एकवार....
पैंजणांचा नाद स्थिरावला
श्वासभरला देह थरथरला
अधोरेखित स्वप्नात पुन्हा
हवाहवासा गुलाबी रंग भरला
**************
पुन्हा एकवार.....
आयुष्यातला चंद्र सजला
अंगातला विरहाचा दाह विझला
मोकळ्या आभाळातला पाऊसही
स्वतच्या थेंबात पुन्हा भिजला
************
पुन्हा एकवार.....
'तू' अलगद आयुष्यात आली
हिरवी गाणी पुन्हा फुलली
तुझी साथ झाली..म्हणुनचं
रातरानी पुन्हा बहरली
**************
पुन्हा एकवार.....
मी माझा राहिलो नाही
हरलो नाही..हरवलो नाही
तू सोबत आहे,म्हणुनचं
चालत राहीलो,थांबलो नाही.
***************
-गणेश शिन्दे®
दुसरबिड,बुलडाणा
9975767537

साॅक्रेटीस..(मराठी मुक्तछंद काव्य)

| |

मी स्वाभिमान पाजळतं
बहिर्यांच्या देशात
माझं...नशिब आजमावतोय..
मी..थोडासां जळतं..थोडा उजळतं..
अंधारभरल्य डोहात,
माझं एकटेपण सजवतोयं.!!

सकाळी अंधार झटकून अंगावरचा
ते..पुन्हा अंधार अंगावर घेइपर्यंत!
एक-एक वेडा जेव्हा समोर येतो
तेव्हा माझ्यातला साॅक्रेटिस जागा होतो..

अन..हाय..तेव्हाच समोरचा वेडा मला
माझ्यादेखतं मला वेडा बनवुन जातो..
हे तसं रोजचचं आहे....दोनचं कपडे...
आलटून पालटून घातल्यासारंख..
मनाला कधी चांगल तर....
कधी वाईट वाटल्यासारखं!!

खरंच.....कंटाळलोय आता..
गड्या आपला गाव बरा...
तिथली लोक,वेडा बनवत असली तरी...
त्यांचा स्वाभिमान पाजळतांना..
आपल्या स्वाभिमानाचं भान ठेवतात...
सुख नाही निदान दुःख तर वाटतांत...
माणुस म्हणुन रोज रोज नाही..
पण कधी कधी तर भेटतात ना??????

-गणेश शिंदे,दुसरबिडकर
9975767537

शस्त्रसंधीचा कशाला??(गजल)

| |

पाहुनी जालिम विषारी माणसाची जात साली..
दंश करणे सोडुनी तो नागही करतो दलाली...!!

शस्त्रसंधीचा कशाला तू उगा धरतेस हेका..
जीवघेणे तीर आधी टाक डोळ्यातून खाली..!!

यार श्वासांची उधारी वाढली भरपूर आता..
अन किराणा जीवनाचा संपण्या सुरुवात झाली..!!

दाखले प्रेमातले मागू नको मजला सखे तू..
कागदे चुरगाळण्याचा नाद मज आहे मवाली..!!

केवढा होतो सुखाचा पाहुण्यासम सोहळा तो..
मग दुखाच्या का शिरावर वांझ असण्याची हमाली?? 

ह्याच गावावर किती रुसला कसा हा पावसाळा.. 
अन हवेने आणली नाही कधी साधी खुशाली..!!

सोडले रागावणे तेव्हा तुझ्यावर जीवना मी..
यार अगतिकता तुझी मृत्यूपुढे जेव्हा कळाली..!!

-गणेश उत्तमराव शिंदे...
दुसरबिड,बुलडाणा..
९९७५७६७५३७

कोठुनी शिकले असे हे विस्तवाने..(गजल)

| |


कोठुनी शिकलेअसे हेे विस्तवाने
आतल्या आतून जळते म पहाणे?

ताठ मानेने जरा जगण्यास गेलो,
मोडले मज 'ताठ' पाहूनी जगाने..!!

गंध आयुष्या तुझा कळल्यावरी मग,
सोडला हेका कसा बघ अत्तराने..!!

प्रेम नुसते वाटण्याची गोष्ट नाही..
जाणले तर स्वर्ग आहे,बघ मनाने..!!

वायदा दुःखासवे कुठलाच नाही..,
पण तरी हा सोबती असतो सुखाने..!!

भावनाही स्वस्त झाल्या फार आता
माणसांनी काढले बघ कारखाने..!!

दूर गेली फार तू कुठल्या कलेने? 
तोडणे अवघड मला अंतर शहाणे..!!

श्री 'गणेशा' तोच माझ्या जिंदगीचा,
घेतला बघ श्वास जेव्हा काळजाने..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

देहास जाळण्याला मीही अधीर नाही(गजल)

| |

अग्नीस जोर यावा ऎसा समीर नाही...
देहास जाळण्याला,मी ही अधीर नाही.!!

आता तरी कळू दे,इजहार काळजाचे..
इन्कार ऎकण्याचा,कानास धीर नाही..!!

माझे मलाच कोडे,श्रावण कसा छळेना..
आता कळून आले,डोळ्यात नीर नाही..!!

दैवास दोष नाही,असलो जरी उपाशी..
ग्रीष्मातल्या झळांचे,कारण शिशीर नाही..!!

प्रेमात मी झुरावे,वाटे जरी मनाला.
पण कुंडलीत त्याने,लिहिलीच हीर नाही..!!

रचल्यात कैक गझला,कोणास याद नाही.  
नंतर कळून आले,मी फैझ-मीर नाही..!!

-गणेश शिंदे
दुसरबिड,बुलडाणा
9975767537

हे असे आभासवाणे(तरही गजल)

| |

तरही गझल
आदरणीय गजलकारा संगिताताई जोशी यांचा मिसरा
''हे असे आभासवाणे चांदणे आता नको..''
---------------------------------------
स्पंदनांची रेशमी तारांगणे आता नको..
(हे असे आभासवाणे चांदणे आता नको..!! )

साजरा कैफात करुया मीलनाचा सोहळा..
पण तुझे 'येते..!' असे ते सांगणे आता नको..!!

घे मना,आकार आता वर्तुळाचा तू जरा..
भावनांचे 'कोपर्याशी' भांडणे आता नको..!!

वादळाचे नेहमी येणे सुरू असतेच ना..?
त्यामुळे तर आणखी घर बांधणे आता नको..!!

श्वास कणसांना मिळो तू एवढे नक्की वहा.. 
उंच ताटांचे भुईवर रांगणे आता नको..!! 

एवढे तारूण्य गेले शोधण्या दैवास ह्या..
मान हलतांना तयाचे पांगणे आता नको..!!

रोज नयनी पावसाळा,हा उन्हाळा आणतो...
फार झाले या ऋतुंना सांधणे आता नको..!!

-गणेश शिंदे,
दुसरबिड,बुलडाणा..
9975767537

बाप नावाचे उडाले(गजल)

| |

बाप नावाचे उडाले मोसमी वार्यात छप्पर...
माय नावाचा किती मग सांडला पाऊस घरभर..!! 

केवढा जीवात तेव्हा जीव येतो काय सांगू..
तो कपाशीचा  दिसावा वाढतांना कोंब झरझर..!!

पावसा छळवाद का हा मांडतो तू माणसांचा..?
यायचे तर येत नाही,जात नाही जायचे तर..!!

रात्रभर बाहेर मी आलोच नाही हाय! दैवा..
अन सकाळी चांदणे संपून गेले यार तोवर..!!

संपुदे 'वनवास' देवा एकदा हा प्राक्तनाचा..
मग हवे तर 'राज्य'ही नाकारतो बघ मीच सत्वर..!!

झोप डोळ्यातील आता जाणवू दे ना जराशी..
जायचे आहे सकाळी 'नीज रात्री' तूच लवकर..!!

फार झाल्या आजवर चोर्या उगाचच ह्या कफल्लक...
भरजरी चोरी करू बघ काळजाची एक स्थावर..!!

-गणेश शिंदे...
-दुसरबिड,बुलडाणा..
-9975767537