शस्त्रसंधीचा कशाला??(गजल)

| |

पाहुनी जालिम विषारी माणसाची जात साली..
दंश करणे सोडुनी तो नागही करतो दलाली...!!

शस्त्रसंधीचा कशाला तू उगा धरतेस हेका..
जीवघेणे तीर आधी टाक डोळ्यातून खाली..!!

यार श्वासांची उधारी वाढली भरपूर आता..
अन किराणा जीवनाचा संपण्या सुरुवात झाली..!!

दाखले प्रेमातले मागू नको मजला सखे तू..
कागदे चुरगाळण्याचा नाद मज आहे मवाली..!!

केवढा होतो सुखाचा पाहुण्यासम सोहळा तो..
मग दुखाच्या का शिरावर वांझ असण्याची हमाली?? 

ह्याच गावावर किती रुसला कसा हा पावसाळा.. 
अन हवेने आणली नाही कधी साधी खुशाली..!!

सोडले रागावणे तेव्हा तुझ्यावर जीवना मी..
यार अगतिकता तुझी मृत्यूपुढे जेव्हा कळाली..!!

-गणेश उत्तमराव शिंदे...
दुसरबिड,बुलडाणा..
९९७५७६७५३७