हे असे आभासवाणे(तरही गजल)

| |

तरही गझल
आदरणीय गजलकारा संगिताताई जोशी यांचा मिसरा
''हे असे आभासवाणे चांदणे आता नको..''
---------------------------------------
स्पंदनांची रेशमी तारांगणे आता नको..
(हे असे आभासवाणे चांदणे आता नको..!! )

साजरा कैफात करुया मीलनाचा सोहळा..
पण तुझे 'येते..!' असे ते सांगणे आता नको..!!

घे मना,आकार आता वर्तुळाचा तू जरा..
भावनांचे 'कोपर्याशी' भांडणे आता नको..!!

वादळाचे नेहमी येणे सुरू असतेच ना..?
त्यामुळे तर आणखी घर बांधणे आता नको..!!

श्वास कणसांना मिळो तू एवढे नक्की वहा.. 
उंच ताटांचे भुईवर रांगणे आता नको..!! 

एवढे तारूण्य गेले शोधण्या दैवास ह्या..
मान हलतांना तयाचे पांगणे आता नको..!!

रोज नयनी पावसाळा,हा उन्हाळा आणतो...
फार झाले या ऋतुंना सांधणे आता नको..!!

-गणेश शिंदे,
दुसरबिड,बुलडाणा..
9975767537