पळपुट्या जखमा किती.. (मतलाबंद गझल)

| |

पळपुट्या जखमा किती मी सोसल्या देहावरी..
फक्त आहे ही इमानी काळजामधली खरी..!!

मानते मी धन्यता मज भेटला गजरा जरी..
मग कशाला चंद्र-तारे बोलशी काहीतरी..!!

लाजल्या नाही कधी जमिनीवरी येण्या सरी..?
ईश्वरा,काही फुले केलीस पण तू लाजरी.. !!

आपली आपण जरा राखून ठेवा पायरी..
नामयाच्या सारखी भेटेल नक्की पंढरी..!!

ऎनवेळी पावसा नाही बरी ही मस्करी... 
एकदा तू हो धरा, बघ काय जळते अंतरी..!!

कैकवेळा पार केली संकटांची मी दरी...
सांग मज नेशील ना आता सुखाच्या त्या घरी..?? 

सावलीसाठीच करतो मी उन्हाची चाकरी..
ईश्वरा सांभाळ माझी लेकुरे अन भाकरी..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537