जगण्यासोबत समन्वयाची कला साधली नाही..!!

| |

जगण्यासोबत समन्वयाची कला साधली नाही..
जगून घेतो तरी जिंदगी जरी चांगली नाही..!!

ह्रदयावरुनी किती मोसमी वारे आले-गेले
एक सुखाची सर मुक्कामी कधी थांबली नाही..!!

जिथे झाड आंब्याचे व्हावे  तिथेच बाभुळ झालो.
नशिबामधल्या काट्यांची मग भिती वाटली नाही..!!

कुठल्याही कवितेच्या गावी जाणे जमले नाही..
आयुष्याची कविता शब्दांमध्ये  मावली नाही..!!

एका श्वासापासुन सगळे जीवन उसने असते..
तरी सत्यता कधीच तू माणसा मानली नाही..!!

-गणेश शिंदे,दुसरबीडकर..
९९७५७६७५३७

तुलाही हवी अन मलाही हवी.. (गझल)

| |

तुलाही हवी अन मलाही हवी..
जगायास थोडी नवी पालवी..!!

खरे सांग मी डाव खेळू कसा..
तुझी पावसा रे नियत पाशवी .!!

जमेना तुझ्याशी मला भांडणे..
मुळातच तुझे बोलणे लाघवी..!!

मला चंद्र मागू नये तू सखे..
इथे भाकरी भेटणे थोरवी..!!

किती बोलती भडभडूनी मला..
तुझे डोरले अन तुझी जोडवी..!!

किती काळ गेला अजुन शोधतो..
कुठे भेटते जिंदगी वाजवी..!!

जुने टाळणे सोड आता तरी..
नवी राहते गोष्ट कुठवर नवी..?? 

-गणेश शिंदे,दुसरबीडकर..
  ९९७५७६७५३७