हळवे कधीच नव्हते..(गजल)

| |

हळवे कधीच नव्हते,आभाळ हे मवाली..
झाले असेल त्याचे अलवार दुख अकाली..!!

घनगर्द सावलीशी नाते कधीच नव्हते..
फिरलो उन्हात तेव्हा ओळख जुळून आली..!!

पोटात भूक आणिक म्हणतो नको नको मी,
मुल्ये जगावयाची गरिबीतही कळाली..!!

बुद्धीबळातले मी नाही मुळीच प्यादे..
बांधून ठेवलेल्या आधीच ज्यास चाली..!! 

डोळ्यातले नको तू,टाकू पुन्हा तरल मिठ..
भाजी समन्वयाची खारट बरीच झाली..!! 

अडवू नको पिकांचे तू एवढ्यात पाणी..
त्यांची 'तहान' देवा आहे तुझ्या हवाली..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर ..
9975767537