उपवास..(विनोदी)

| |

उपवास म्हटला की लगेचच पुलं आठवतात..हो पण माझा उपवास
पुलं च्या आसपास ही फिरकू शकत नाही.कुठे 'आयफेल'वरचे
पुलं आणि कुठं 'टिनशेड'मधला मी..असो ..पुलंच्या उपवासाच
कारण वेगळं होतं,माझा मात्र कारणांचा उपवास आहे..पुलं असते
तर त्यांच्यासोबत
लग्नाच्या पंगतीतही बसण्याची आपली औकात
नसती,लेखनपंक्तिची बात सोडाच..पण ऊगाच
मुलगा जसा बापाच्या शर्टाला धरुन मागेमागे जात असतो तसचं
मीही पुलं'बाबांचा अंगरखा धरून ,शेंबूड पुसत लिहिण्याचा पोटभर
प्रयत्न करेन.. पुलंचा उपवासाचा अन
माझ्या उपवासाचा 'विषय' जरी एक असला तरी 'आशय'
कुठेतरी वेगळा आहे,हे यथावकाश कळेलच आपल्याला....!!
''अहो..ऊठायचं नाही का आज,?आठ वाजून गेलेत..''
बायकोचा खणखणीत चिल्लर सांडल्यासारखा आवाज
आला अन मी दचकून पलंगावर ऊठून बसलो..'मी नाही..मी नाही''
बरळता बरळता बायको म्हणाली,'काहो?स्वप्नात माझ्या लपून
कुठले ऊद्योग चालू होते??'
तीच्या डोळ्यातला 'चटका'लागल्यावर पूर्ण शुध्दीवर
आलो..''अगं ,काही नाही,असचं आपलं..'' अन कसंनुस हसतं
उत्तरलो..'अहो,कलेक्टर ने आषाढी ऎकादशी ची सुटी 'डिक्लेर'
केली ते नुसत झोपायला का??मी हे विचारत होते की,आज
ऎकादशीचा उपवास करणार की,तुमच्यासाठी कुकर लावू??
बायकोला उत्तर देणार इतक्यात रोजच्या वरण
भाताच्या दुसर्या तागड्यात
मला साबुदाणा पोहे,चिप्स,बटाटे,रताळ्याचा खरपूस तूंप
टाकलेला शिरा,राजगुरा,दाण्याचे लाडू ई.ई.भरलेले आढळले,अन
साहजिकच फराळी यादीचं पारडं जड
झालं..मी मोठ्या भक्तीभावानं म्हणालो,''अगं
वेडे..अवघा महाराष्ट्र,अर्धा कर्णाटक अन अर्धा आन्ध्र
ज्या विठ्ठलाला भजतो,त्याचे आजच्या दिवशी गुणगाण
करतो,त्याच्यासाठी उपवास करतो,त्या 'सावळ्यासाठी' मी एक
दिवस उपवास केला तर बिघडलं काय??
बायकोला बहुदा माझ्या तोंडात जमा झालेली 'लाळ'
ऎव्हाना कळली होती..'बरं..बरं..'' असं म्हणून ती किचनकडे
वळाली..
मी घाईने ऊठलो,बाथरुम मधुन ब्रश व पेस्ट घेऊन 'पाकशाळेत'
गेलो..गॅसवर तेल पिऊन कढई बसलेली दिसली,हायसं
वाटलं..ब्रशवर पेस्ट घेतो न घेतो तोच झुरळ पाहिल्यासारखं
बायको किंचाळली,''ई...शि बाई..तो ब्रश आणि पेस्ट
ठेवा आधी..'' मला कळेचना,''अगं..काय झाल?
उपवासाच्या दिवशी भटजीबुवांनी दात
घासायची बंदी सांगितली का''? ''अहो..मी टिव्ही वर
बघितलयं,ब्रशचे केस प्राण्याचे असतात म्हणे,अन
पेस्टमध्येही हाडांचा चुरा मिक्स असतो''बायको दमात
ऊत्तरली...मला बायकोच्या तर्कशास्त्राचा हेवा वाटला..मी
म्हणालो..'वेडे..ते रंगवायचे ब्रश असतात,आणि पेस्टमध्ये काय
टाकतात हे बघणारी तू काय,'क्वालिटी कन्ट्रोल मॅनेजर' आहेस
का?? 'ते मला,कळतं नाही,तेलाल दंत मंजन आहे,आज त्याने
दात घासा'' तीने निर्णय जाहिर केला..'मग
यातही विटांचा चुरा असतो म्हणे'' मी खोचक
बोललो..''असेना का,विटा शाकाहारी आहे,अन तसही आज
'विटेचाच' मान आहे,घ्या मुकाट्याने''..आज दिवसभर
तीला किचनमध्ये त्रास द्यायचा असल्याने मी निमूटपणे
हा त्रास सहन करत होतो...
शुचिर्भूत होवून बातम्या घेत
असतांना,बायको आली..'अहो,निदान आज तरी थोडा 'हरीपाठ'
वाचावा माणसाने,सकाळी सकाळी''..मला झिणझिण्या आल्या,''अगं
बाई..मी काल रात्रीपासून काही खाल्लेल
नाही,उपासीपोटी कुठलही युद्ध जिंकता येत नाही,अन
देवालाही ते आवडतं
नाही..जा थोडासा बदामशिरा कर,मोठी प्लेटभरून..बाकी नंतर
सांगेन..'' माझा रवैय्या पाहून बायको,हळूच कानात
पुटपुटली...''आपलं पोट बघितलं का??
त्या कोपर्यावरच्या 'नटमोगरी' सारखं दिसते आहे,अन म्हणे
युद्ध,अन उपाशी'' तशी ती तनतनत किचनमध्ये गेली.. म्हणजे
एक गोष्ट मला कळाली होती..'नटमोगरी'ला दिवस
गेलेत..माझ्या पोटावरून हात फिरवत मी अंदाज बांधला..म्हणजॆ
तिसरा महिना..तरिच म्हटलं..अशात जरा नटमोगरी 'बेढब'
कशी दिसतेय.. ..:-)  :क्रमश:

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
  9975767537

हे रोजचे तुझे बघ.. (गझल)

| |

हे रोजचे तुझे बघ,लटके रुसून जाणे..,
पाणावल्यावरी मी,हलके हसून जाणे..!!

तू चाळतेस माझे,पंचांग रोज सखये..,
आता तरी जमूदे,शुक्राचे फसून जाणे..!!

होतात का असे हे,आभास पावलांचे..,
आवाज पैंजनांचे,कानी ठसून जाणे..!!

आहे फितूर येथे,जन्मास लाभलेले..,
त्यांचे छळून जाते,सोबत बसून जाणे..!!

वक्तृत्व दूर आहे,माझ्यामधून मित्रा..,
तरिही सभेस कळते,माझे असून जाणे..!!

सरकार तेच टिकते,ज्यांना जमून येते..,
तोंडास ह्या प्रजेच्या,पाने पुसून जाणे..!!

मोहास टाळणेही,घ्यावे शिकून आता..,
वाटेवरी श्रमाच्या,कंबर कसून जाणे..!!

सोडून दूर गेली,माझीच सावली मज..,
अंधार याद देतो,तुझिये नसून जाणे..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर...

दार नाही लावले..(गझल)

| |

परत जातांना सुखाने,दार नाही लावले..,
हेरले तितकेच आणिक,त्या दुखाचे फावले..!!

मोह झाला कांचनाचा,कैकदा मज जीवनी..,
त्याचवेळी झोपडीने,ते 'कवडसे' दावले..!!

फाटक्या पदरास माझ्या,ह्या फुलांनी टाळले..,
वाट माझी पाहणारे,तेच काटे भावले..!!

रोजची ती देवपूजा,आज झाली सार्थकी..,
दूर करण्या दुःख माझे,'यम' मला हे पावले..!!

तू म्हणाली चांदणे दे,सिद्ध करण्या प्रेम हे..,
पाहता अंधार घरचा,मन उगाचच कावले..!!

सोडतांना गाव माझे,तू न मागे पाहले..,
श्रावणास पुरेल इतके,थेंब नयनी मावले..!!

लोप झाला संस्कृतीचा,देव झाला खेळणे..,
सोडले किर्तन बुवांनी,नर्तनाला धावले..!!

आम जनता पायपुसणे,राज्यकर्त्यांच्या घरी..,
लोकशाहीला कसे या,ढेकणांनी चावले..??

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..

बर्याचवेळा.. (गझल)

| |

भरल्या घरात रडणे,असते बर्याचवेळा..
भिंतीस दुःख हळवे,छळते बर्याचवेळा..!!

देठास हात लावू,कैसा तुझ्या फुला रे..?
नाते असेच अपुले,तुटते बर्याचवेळा..!!

ओठावरी जरासी,हलकेच शीळ येेता..;
मैना घरातली मग,खुलते बर्याचवेळा..!!

व्यापार पाहुनी हा,प्रेमात मांडलेला..;
काळीज फार सुर्या,जळते बर्याचवेळा..!!

त्रिज्या,परिघ वगैरे,असुदेत जिंदगीला..;
छेदून व्यास काही,निघते बर्याचवेळा..!!

खेळी कितीक वेड्या,करशील ईश्वराशी,,;
त्याला मनातले बघ,कळते बर्याचवेळा..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

मी ऎवढा खास नाही.. ( कविता)

| |

मी एवढा खास नाही..
कोवळा मधुमास नाही..
चंदनापेक्षा ही झिजलो..,
पण मला सुवास नाही.. !!

प्राक्तनातच हाल होते..,
फक्त भिजले गाल होते..
शोधता अस्तित्व माझे..,
तेही फक्त कंगाल होते..!!

फाटली स्वप्ने जराशी..
बाळगू किती ऊराशी..
वेदनेचे चांदणे का..,
हाक देई,ह्याच दारी?

फार झाला खेळ सारा..,
यातनांचा हा शहारा..
हे विधात्या,एकदा दे..
ताठ होण्याचा इशारा..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

हे सगळं तुलाही जाणवतयं..(मुक्तछंद)

| |

वेडी आहेस तू...
मनाच्या भिंती..
मुकाट आसवाने सारवतेस..
कळूही देत नाहिस...
आतल्या मातीचा वास..!
वादळी पाउस होतेस...
अन सगळ्यांना छत्री देतेस...
तुझं बरसणं जाणवुही देत नाहीस..!
चुलीतली धग मनात ठेवून..
वर बर्फाचा थंड गोळा होतेस..
कुडकुडत राहते एकटीच..,
तापला निखारा होवून..!
खर तर...,
सगळ्यानाच देते काहीना काही...
मग का डोळे याचनाशिल??
बदलत्या ऋतूच्या हिंदोळ्यावर..,
मनाला झुलवतेस...!
सोड ना यार...सगळचं ते..,
माहितेय मला....
हे सगळं तुलाही जाणवतयं...!!
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
- गणेश शिंदे,दुसरबिडकर..
  9975767537

काव्याग्रह: कवितेचा वसा.. (रसग्रहण)

| |

परवाच 'काव्याग्रह' चा छोटासा,सुटसुटीत पण साहित्याने ठासून
भरलेला, दिवाळी अंक हातात पडला..मनोवेधक मुखपृष्ठ
आणी अशोक कोतवालांची 'का रडताहेत मुली' ह्या कवितेवरून
आत बरचसं 'मनात' पोचणारं असेल,हे समजून गेलं.. जेमतेम
सहावा अंक..पण त्याला अंकाऎवजी 'वृक्ष' हे नाव...खरेच संपादक
विष्णु जोशी यांच्या कल्पकतेला साजेसं...कारण रोपटंही असलं
आणी तळपत्या उन्हात त्यानं
आसुसलेल्या जिवाला दिलेली थोडीशी सावलीही त्याला वृक्षपदावर
पोचविण्यास योग्य..तेच 'काव्याग्रह'बाबतही...!!
एकंदरीत अंक सुंदर वाटला..कवितांना वाहिलेला असल्याने,बर्याच
उत्कृष्ट कविता वाचावयास मिळाल्या...'अक्षरांचे सूर'
ह्या किशोर बळींच्या
काव्यसंग्रहाच सदानंदजी सिनगारे ह्यांच सुंदर
समिक्षण,अनिलजी कांबळे यांच्या 'झोपडी नं 12' चं, बाबाराव
मुसळे ह्यांनी केलेलं विश्लेषण..तसेच अजिम नवाज
राही यांच्या 'कल्लोळातला एकांत'ला,नामदेव चं.कांबळे
ह्यांच्या लेखणीतून मिळालेली योग्य दाद..खरोखर वाचनीय..जणू
सगळेच संग्रह वाचल्याच समाधान..!!
कै.षाबा कुडतरकर ह्यांच्या मूळ कोकणी कवितांचा,डाॅ.अन
ुजा जोशींनी केलेले मराठी अनुवाद बरचसं वेगळं
वाचल्याची अनुभूति देतात..स्मिता पाटील,रमेश वाघमारे,समाधान
खिल्लारे,मनिषा साधू,विलास अंभोरे,बालाजी मदन इंगळे,रविंद्र
जवादे,जगदीश पाटील,रावसाहेब कुंवर,मावध पवार,कैलास
पगारे,गजानन फुसे आदी कविंच्या कविता खरचं वाचनीय
झाल्यात..
केतन पिंपळापुरे यांच्या 'मकाबी' काव्यसंग्रहाचं वेगळेपण मोतीराम
कटारे ह्यांच्या लेखणीतून फार सुंदर उतरलयं..कविता विचारात
पाडतात माणसाला..!!
दिलीप विरखडे यांच्या 'ऎन पस्तिशीत'
ह्यांच्या कवितेच्या 'व्हरायटीज' किरण डोंगरदिवे हे विविध अंगल
मधुन वाचकापर्यन्त पोचवतात..अशा बर्याच गोष्टीतून साकारत
अंकाच वेगळेपण बरं वाटल..आतूनबाहेरून मुखपृष्ठ,मलपृष्ठ
सोडल्यास बाकी अंक कृष्णधवल आहे,पण वाचतांना हे मुळीच
जाणवत नाही..हे लक्षात येते अंक पुर्ण वाचून,विचार
करत,उगाचच चाळतांना...कदाचित अंकाच्या दर्जेदारपणाच हेच
लक्षण अन कौतुक असु शकतं...
पण जरा दोन गोष्टी नमुद
कराव्याशा वाटतात..मराठी गझला बहुदा नाहितच अंकात...शक्य
झाल्यास कवितांसोबत मराठी गझलेलाही योग्य न्याय
द्या...आणी दुसरं म्हणजे संपादक विष्णु जोशी फार छान
लिहितात,मी त्यांच्या तोंडून समक्ष ऎकलयं त्यांना..तर
त्यांनीही मनाला जे वाटलं..भावलं..ते 'संपादकाच्या लेखणीतून..'
अशाप्रकारच्या सदरातून वाचकांपर्यन्त पोचावं..ही प्रांजळ
ईच्छा...
बाकी अंक छान जमलाय..संपादक ,काव्याग्रह टिमचे अभिनंदन
आणी काव्याग्रहच्या भावी वाटचालीस शुभकामना....!!
(अधिक संपर्कासाठी..
काव्याग्रह प्रकाशन,
डाॅ.घुनागे हाॅस्पिटलमागे,मुख्य पोस्ट कार्यालयासमोर,व
ाशिम,ता.जि.वाशिम..444505..
मो.9623193480 )
e-mail: vishnujoshi80@gmail.com

-गणेश शिंदे,दुसरबिडकर
9975767537


गणाचे अभंग (अभंग)

| |

रातपंखाखाली
झोपलेला गाव,
जागा झाला घाव..
मनातला.. !!

वेदनांचा टाहो,
मावेना मनात..
सतत कानात..
घंटानाद.. !!

आयुष्य सुखाने
जगू देत नाही
मरू देत नाही
सुखासुखी..!!

ईश्वरा जरासा
घेरे बापा त्रास
लेकरांना घास
मिळो सदा.. !!

आयुष्या तुझी ही
रोजची उधारी..
माझी ही नादारी
सोसवेना..!!

खुप झाला वेळ
येईना तू कसा
मृत्यू भरवसा
तुटताहे..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

बापू.. (व्यक्तिचित्रण)

| |

बालपणीचा काळ खरचं सुखाचा असतो..मग ते बालपण
कितीही गरिबीतले असले तरिही..आमच कुटूंब खर्या अर्थान
फार मोठ्ठ होत...जवळपास वडिल धरुन
सहा चुलत्यांचा विस्तार..सगळ्याच्या चुली वेगळाल्या पण
बाकी कारभार सगळा एकत्र..सगळ्याच्या एका रांगेत दोन
दोन
खोल्या होत्या..अन बाहेर एक ऊंबराच आभाळ कवेत घेणार
एक
मोठ्ठ झाड..आणि त्या झाडाखाली एक
बांबूची,सणकाड्यांनी शाकारलेली झोपडी असायची अन तिथे
रहायचा या सगळ्या खटल्यावर लक्ष
ठेवणारा 'सम्राट'..बापू..आमचे आजोबा..!!
आजी बापूला केव्हा सोडून गेली मला कळत नव्हते..पण
तेव्हापासुन बापूंनी सगळ्यांच्या खोल्यापुढ
निवारा शोधला होता..मला आठवतं,बापू कुणाच्याही खोलीत
कधी गेलेच नाही..रापलेला चेहरा,पण माया दावणारे बारिक
डोळे,चिलिम ऒढुु ओढु खप्पड झालेल्या गालावर पिळ
दिलेल्या मिशा,तुळतुळीत दाढी,डोक्याला सदैव
पिवळा पटका,मस्तकावर अष्टगंध
आणि बुक्का..कानाच्या दोन्ही पाळूला दारावतीचे
ठिपके...काही शाबुत तर काही दातांनी रामराम
ठोकलेला,सहा फुट ऊंचीला शोभणारी शरिरयष्टी..अन सतत
हातातल्या तुळशीच्या माळेशी,बोटांची चाललेली स्पर्धा..पायात
करकर वाजणारी नर्ही अन धोतर-
बंडीतली ती मूर्ती आजही आठवते..
आमच पन्नास ऎकराच्याही वरच रान असेल तेव्हा..पण सगळ
ऎकत्र होतं..बायाबायांची भांडण नव्हती..भावाभावांचे वाद
नव्हते..फक्त स्वयंपाक वेगळा अन
झोपायच्या खोल्या..बाकि सगळ्यांची जेवण सकाळ
संध्याकाळ
बापूच्या समोर
ऊंबराच्या झाडाखाली गोपाळकाला व्हावा तशी व्हायची..बापू
जास्त बोलायचे नसत मोठ्यासोबत..पण आम्हा लहाणासोबत
अगदी लहान होवून
रमायचे..माझ्यापेक्षा माझ्या मोठ्या बहिणीवर बापूंचा जीव
जास्त..ती जरा तब्येतीने सगळ्या मुलात कृश होती..मी तर
पहिल्यापासून दांडगटच..त्यामुळे आमच्या चोरून बापू
तीला खोबरं,गुळफुटाणे,पेरू अस जे दिसेल ते आणायचे..तिने
खाऊन ऊरल की मग बापू आम्हाला हाळी द्यायचे..पण
म्हणून
ते आमच्यासाठी वाईट कधीच झाले नाहित..ऊलट
त्या बहिणीकरता अन बापूकरिता आमचा जीव अधिक
तुटायचा..
बापू सुनांना म्हणजे आईना ,काकूंना कधहि ऎकेरी बोलायचे
नाही..अहो-जाहो करायचे..वडिलांच्या अन
चुलत्यांच्या बाबतीतही तेच..बापूना कधी सुनांना जेवण
मागण्याच
काम पडल नाही..कारण बापू आल्याशिवाय कुणिच
जेवायला बसायच
नाही..आमच्यासारखी चिल्लीपिल्लीही बापूच्या वाटेकडे डोळे
लावून असायची..बापूकडे
गोष्टींचा खजाना होता..ऊडती माडी,फिरता कळस,कळवातनीची
कथा,दामु सुताराची कथा न जाणो अशा कैक
गोष्टींना आमच्याबरोबर
रात्रीला मोठी माणसही हजेरी लावायची..बापूची चिलिम खास
आवडायची मला..त्यातील कपडा पाण्याने धुवून देणे ,तंबाकु
साफ करणे,खडा पुसून देणे ई.कामे
करता करता मलाही कधीकधी ती ओढून पहायचा मोह
होई..पण
ऎकदाच नुसती चिलीम ओठाला लावून पाहण अन
बापूंची सनकन
गालात वाजण झाल..तेवहापासून तो मोह आवरला..पण सुप्त
ईच्छा आजतागायत कायम आहे..
आमच रान फारस पिकायच नाही..किंवा तॆव्हाचा काळच
दुष्काळाचा होता अस म्हटल तरी हरकत नसावी..त्यामुळे
रानात मिळणार्या गोष्टींचेच खेळणे,खाणे
असा लळा बापूंनी लावून दिला होता..बापूंना मात्र
चहा हमखास
दोनचार वेळेस लागायचा..गूळाचा..दुध नसले तरी चालेल पण
त्यांच ऎक पितळी दिड दोन कपाच 'गटले' असायच ते भरुन
चहा लागायचा..पण ते ही कोणत्या सुनेला सांगायच काम
नव्हत..कुणीही चहाच आंदण ठेवल की ती ऒरडून
सांगायची,'बाईवो,म्या मामाजीले च्या ठुला बरं..' अन
बापूच्या चेहर्यावर स्मीत
पसरायच..मी सहा वर्षाचा होईपर्यन्त
मला बापूचा साथ लाभला होता..बापूच्या आठवणी खुप
आहेत,मला फारशा आठवत नाही..पण
जितक्याही आठवतात,तरळलेल्या डोळ्यातून बापू दिसतात..
अखेरच्या दिवसात बापू फार खंगले होते,खाण्यापिण्याच
काही ददात नव्हती..पण या वळणावर त्यांना 'आजी जास्त
आठवत असावी..त्यांच चिलिम पिण्याच प्रमाण ही खुप झाल
होतं..सतत खोकॊक..रात्री बेरात्री खोकल्याची उबळ
ऎकल्यावर पटकन बाबा अन चुलते तिकडे
धावायचे..सगळ्यांना..व बापूंनाही कळून चुकलेल
होत..होणारी गोष्ट होणार आहेच..गावात डोक्टर नव्हतेच,एक
दिवस असीच जोरदार उबळ आली..वडिलांनी पटकन
गाडी जुंपून
बापूला गाडीत घेतले सोबत लहाने चुलते व शहराच्या दिशेने
धावले..पण सकाळपर्यंत बापूच निष्प्राण कलेवर दारात
होत..बापून घरादाराला काय दिल त्यावेळी कळतं नव्हत..आज
जाणवतय,बापूंनी घराला 'घरपण' दिलं होतं....!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

तुही पुरवू हावुस.. (मराठी ग्रामिण कविता)

| |

तुही पुरवू हावूस
राणी येवू दे पावूस..
मह्या मनाच्या शिवारा
नगं सोडून जावूस..!

रानं हपापेल हाये..
कहीपसून जिवाचं,
भेगाळल्या तनामंधी,
बी हे थांबेल कव्हाचं..!!

लय वर्स वर्स झाली,
गेली मिटना तहान..
ईहिरीच्या तळातला,
दिसे कातळ पहा नं..!!!

गेल्या सुन्या कैक सुग्या..
कोठारालं वास नाही..
भाकरीच्या भुकंलाही..
पोटभर घास नाही..!

देवा,लय झालं आता,
पोटासाठी अंत नगं,
जिंदगानी घे तू तुही..
मलं आता खंत नगं.. !!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

येतो म्हणतांना...(अष्टाक्षरी कविता)

| |

'येतो...' ..म्हणतांना...
पाऊल अडखळत
उंबरठाही थीजतो
निरोप घेतांना कसा
उगा चेहरा भिजतो...!!

निघत नाही सहसा
मग हातातला हात
सुटता सुटत नाही
कशी मिठीतली साथ..!!

डोळ्यात वाहत पाणी
काळजात खळबळ
नजरांना टाळूनही
पाहण्याची कळकळ..!!

जाववतं नाही अन
मागे पाहवतं नाही
दुराव्याचे क्षण असे
मग साहवत नाही..!!

'जपत रहा..स्वतःला.'
ओठ अडखळतात
सांगायचं खुप, पण
शब्दच अडकतात..!!

'येतो..'त्याचही तसंच
झर्रकनच वळतो..
पावसाळी डोळ्यांतून,
पार दिसेनासा होतो ..!!

खराच पाऊस आता
मुसळधार वाहतो..,
तीच्या,त्याच्या डोळ्यातच
मुक्काम करु पाहतो.....!!

आषाढातलां वैशाख
संपत नाही जोवर...
डोळ्यातले कृष्णमेघ
संपत नाही तोवर.....!!!!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर....
  9975767537

वर्ष सरलय बघ... (मुक्तछंद)

| |

वर्ष सरलयं..बघ पाहता पाहता,
वय निसटलय,वाहता वाहता..
तुला ऎकू येतात का??
वर्षभर घरात किणकिणनारी तुझी काकणं??
रिकाम्या डब्ब्यांची उगाच वाजणारी झाकणं??
वय वाढतयं..आपल्या संसाराच..दरवर्षी...
वय वाढतयं..आपल्यातल्या दुराव्याच..
दरवर्षी...
आपल्यातला जिव्हाळा खरतरं वाढायला हवा...
चार भिंतींनिही लळा खरतरं आपला ताडायला हवा...
तुझ्यासाठी आणलं नाही हक्कान काहीबाही...
पण म्हणुन माझी माया काही पातळ झाली नाही...
जाणवतेच ..
तू धुसफुसतेस माजघरात काही क्षणी...
अन तू मुसमुसतेस डोक्यावर पांघरून मनोमनी...
फक्त हात तुझ्या डोक्यावरून फिरवायचा राहून जातो..
डोळ्यातला भाव तुझ्या टिपायचा राहून जातो...
कसं सांगू..बाहेरचा ताण माझा घरी येतो..
तुला जवळ घेता घेता,दुसरा विचार उरी येतो..
गजरा-बिजरा रुचला नाही..आणायचा तुला..
तुझा कधी हट्ट नव्हता हेच आणा मला...
आता मात्र वर्ष गेलं...खुप काही कळतयं..
तुझ्या मनात शिरण्यासाठी काळिज मुकं जळतयं...
वाद झाले..शब्द तुटले..झालं गेलं विसरुन पुन्हा..
नवा जन्म..तुही घ्यावा.. मीही जन्मेन पुन्हा....!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

डोळ्यावरती झुलतं गाव (काव्य)

| |

डोळ्यावरती झुलत गाव,
ओठावरती तिचच नाव..
तिच्या सगळ्या पायवाटा,
मनामध्ये कोरल्या राव... !!
तिने फक्त वळून पहाव..
मीही नुसत उभं रहाव..
संभाषण नसल तरी..
ओळखीच स्मित द्याव....!!
♥♥♥♥♥♥♥
-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

जिजाऊगझल

| |

जिजाऊंच्या चारशे सतराव्या जयंतीनिमित्य
माता जिजाऊंच्या चरणी 'मातृतिर्थाचा रहिवासी'
ह्या नात्याने
माझी जिजाऊवंदना शब्दगझल स्वरुपात सादर समर्पित...!!
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

सिंदखेड तू केले पावन माय जिजाऊ..
शिकवलेस तू शिवबाला रण माय जिजाऊ..!!

सुर्यतेज ते उदरी जपुनी वाढवले अन,
जाहली स्वराज्याचे कारण माय जिजाऊ...!!

फिरवलास सोन्याचा नांगर या धरतीवर,
जिंकलेस तू रयतेचे मन माय जिजाऊ..!!

भावनेतही केली नाही कसुर जराशी,
तोडलेस माहेरा झटकन माय जिजाऊ..!!

चरणकमल तव 'निशिगंधाला' पुज्य सदाही..
या मनास लाभू दे तोरण माय जिजाऊ..!!

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
जय भवानी॥ जय जिजाऊ॥ जय शिवराय॥

-गणेश शिंदे,दुसरबिडकर
9975767537


बहुजनांचा मेळावा (स्थलवर्णन)

| |

काल 12जानेवारी..वंदनिय मातोश्री जिजाईं
आऊसाहेबांच्या 417 व्या जयंतीनिमित्य मातृतिर्थ
सिंदखेडच्या शिवसृष्टीवर जाण्याचा सुवर्णयोग आला..तस
पाहिलं तर मी हा योग दरवर्षी आवर्जून जुळवून आणतोच..
अमाप 'मावळ्या'ची संख्या मोजता आली नाही मात्र
प्रत्येकाच्या चेहर्यावरचा आनंद,उत्साह मात्र कैकपटीन
क्षणोक्षणी जाणवत होताच...!!
सिंदखेडराजाच्या अलिकडून भली मोठी वाहनांची गर्दी,भगवे
रुमाल,निळे रुमाल,झेंडे,फेटे अन
जिजाऊंच्या जन्मस्थळाच्या दर्शनाची ओढ
प्रत्येकाच्या नसानसातून वाहत होती...पार MH01 पासून ते
RJ,MP,CG,GJ अगदी HP पासिंगच्याही गाड्या बघून
आमच्या तालुक्यातल्या न जाणार्या व
रविवारच्या सुटीचा आनंद घरी लोळत
घालणार्या जिवांची मला किव वाटली...राजवाड्यात जायचे
नसतांना फक्त गर्दीच्या चेहर्यावरचा आनंद टिपून
स्वतः आनंदीत होण्यासाठी मी घंटाभर तिकडे रेंगाळलो...हौसे
ने राजवाड्याजवळ quick photo 20रुपयात काढूनही घेतले..
बाहेर येवून गाडीला किक मारली अन शिवसृष्टीकडे
वळलो..दुतर्फा सिंदखेडराजा पूर्णपणे 'जिजाऊमय'
झाल्याची आत्मानूभुती होत होती..गाड्यांच्या गराड्यातून
शिवसृष्टीकडे वळलो..दुरून लक्ष वेधणारी शिवसृष्टी आज
अलौकिक थाटात येणार्या लोकांच स्वागत करतांना खरोखर
भारावून गेलो..भाषणे ऎकण्याच्या फार कंटाळा पण
त्यातूनही वक्त्यांच्या बोलण्यातील बरेचशे शब्द नकळत
अंगावर काटा आणत होतेच...आश्चर्य वाटलं..कुठून येत
असेल श्रोत्यांची काळजांला हात घालण्याच कसब
या मंडळीना?? जिजाऊच्या भव्य मुर्तीला जागेवरूनच
अभिवादन करून मी खरा पुस्तकांच्या जत्रेत घुसलो..प्रत्येक
प्रकाशनांचे असे जवळपास दोनशेच्यावर पुस्तकस्टोल्स
पाहून आनंद वाटला.. प्रत्येक स्टोलला भेटी देत,पुस्तके
न्याहाळीत जाण्याचा आनंद काही औरच..प्रत्येक पुस्तक
घ्यावसं वाटायच..पण किंमती पाहून मोह आवरता घेत
होतो..राष्ट्संतापासून बाबुराव बागुल,दया पवार,मा.म.देशमु
ख,आ.ह.साळुंके ते आतापर्यन्तच नविन मंडळीपर्यन्त
सगळ्यांची पुस्तके मन वेधित होती..खर्या अर्थान
निळ्यापासून,हिरवे आणी भगव्यापर्यन्त समग्र 'रंगाच'
साहित्य एका छत्राखाली दिमाखात बसलेल होत...
तीन वाजेपर्यन्त भरपुर पायपिट केली,चार पुस्तकांना थैलीत
जागा दिली,बचतगटांच्या स्टोल्सना भेटी देवून
बायकोसाठीही काही 'उपयोगी' स्वयंपाकघरातील
जिनसा घेतल्या..भूक
लागलेली होतीच..एका बचतगटाच्या स्टोलवर मस्त गरमागरम
हुरडा नि मक्काची कणसे भाजतांना बघुन राहवल नाही..मस्त
चटणी आणी हिरव्या मिरच्यासोबत अवघ्या तिस रुपयात
मस्त ताव मारला...नंतर दोनतीन
ठिकाणी रक्तपेढीचा रक्तदान शिबिरांचे स्टोल
दिसले..मुलतः असलेली सामाजिक 'ऊर्मी' जागी झाली..फाॅर्म
भरला..तिथल्या नर्सने माझे डोळे काळजीपुर्वक बघितले
आणी विचारल 'तुमच हिमोग्लोबिन' कमी असत का'??'
अर्थात माझ hbकमी असतच...म्हटल बारापर्यन्त
असेलच..तिने चेक केल्यावर 11.8आल...ती sorry
म्हणाली...तेथून नाराजीने बाहेर पडलो..पण एक जाणवल
की सामाजिक कामही करायच असेल तर 'सुदृढ' असणं
गरजेच आहेच...
पाच वाजता तेथून बाहेर पडलो..काहीशा तृप्त काहिशा अतृप्त
मनान...जिजाऊसृष्टीकडे,माणसांच्या गर्दीकडे एकवार
डोळेभरुन बघितल..आणी परतीच्या वाटेकडे निघालो..मध्येच
रस्त्याने जातांना राष्ट्रीय किर्तनकार सत्यपाल
महाराजांची गाडी दिसली...प्रेमाने मी तिकडे हात
दाखवला..सत्यपाल महाराज होते की नाही माहित नाही..पण
चालकाने हात दिला,समाधानाने निघालो..
सगळ्या समाजांना एकछत्र,एकरेषेखा
ली आणणार्या जिजाऊंचा समाज,त्यांचा वारसा बघून कट्टर
लोकांनी जरुर येथे येवून
आपली कट्टरता जिजाऊंच्या चरणी वाहून द्यावी...कुठेतर
ी मनात वाटल...आणी निघालो..पुढील वर्षी परत
येण्यासाठी ..घडलेेले बरेचशे 'अपेक्षित बदल'
बघण्यासाठी......!!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर...
9975767537


वाढे उन्हाचा हा जोर (अष्टाक्षरी काव्य)

| |

वाढे उन्हाचा हा जोर
फुले आंब्याला मोहोर..
पान-पान झाडाखाली..
कोण टाकतो हा चोर..!!

गर्द रानात पळस..
दारी बोडखी तुळस..
भर ऊन्हाने चकाके..
तुझ्या मंदिरी कळस..!!

ढग हिरवे संपले..
झाले रस्ते फुफाट्याचे ..
शेत भयान उदास...
झाले वाळल्या काट्यांचे..!!

दिस संपता संपेना..
ओल कुठेच दिसेना..
कोमेजला मोगराही..
बघ सांजेला हसेना..!!

मनाभोवती सावली..
ऊन उतरता आली..
गर्दी आठवांची तुझ्या..
अवचित जमा झाली...!!

कसा लख्ख आठवला..
भिजलेला पावसाळा..
तुझ्या संगती सोबती..
गोड झालेला हिवाळा..!!

झळा पुरतील मला..
क्षणोक्षणी अशा आता..
शिकवेल जगण्याचे..
याद तुझी जाता-येता...!!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

लगनाचा माहोल (विनोदी)

| |

''का वं..?? आपल्या सुमीच्या लगनात धुरपताबाईन
काय देल्त व आंधन?''
''कोणची वं?? अरणीची मामी का?? तीन देल्त माय
चिक भिजवायच भगोण..निर्रा टप टप आवाज ये
टपराचा..काय हारमालात घेतल व्हत देवजाणो..पण
काहून पुसून राह्यले आता?'',
''आव..तिच्या पोरीच जुटल..पाच एकरावाला नवरदेव
हाये..पोरगा टॅकटर चालोते..एकुलता एक बी ..घरच
वावर संभाळून टॅक्टरवर पन जाते..मायले
हिची भन..आहेरयी घ्या लागीन..भांडबी द्या..जायाचे
दोनशे गेले..''
''सांगून ठिवतो..आंधन मोठ्ठ घ्याच्या भानगडीत पडू
नका..कायी उपकार
नाही सटवीले..आपल्या कायी पोट्टीच लगन
नायी रायल आता...माहा बाबू त लहानच हाये
अजून..देईन त्याचा सासरा....अन
मायं..तिच्या घरचा लुगड्याचा बोया पायला का??
पिस देला त चार ठिकाणी डागी..अन
तुमच्या टायेलटोपीले त बदबद कुकाचे डाग लागेल
होते आदीचेच..''
''आवं चालतच रायते..उसनं त फेडा लागीन न??.'
''काय नाही उसन अन फिसन..घरात आहेराचे लय लुगळे
पडेल हाये अन टायेलटोप्याबी..नेऊ त्यातलच...अन
सुमीच्या लगनातले चारपाच जरमलचे डब्बे म्या मांग
सारून ठिवेल होते..त्यानच बोळवू तीले..सांगून
ठिवतो..नायी त तुमाले लय मोठेपणा करा वाट्टे..अन
तिच्या पुढी त लयच'..नकटी मेली..''
फिलींग 'लगनाचा माहोल''

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

बाॅर्न इन द गारबेज (रसग्रहण)

| |

लघुकथांनी मराठी साहित्याचं फार मोठं क्षेत्र व्यापलेल
आहे.आजच्या पिढीच्या लघुकथा पुर्वीच्या कपोलकल्पित
किनारी,चन्द्रतार्यांच्या साक्षी,बागेतल्य
ा गुजगोष्टी इत्यादींना फाटा देत
आपल्या अवतीभोवतीच्या नोंदींना डोळसपणे बघायला शिकवत
आहे.लघुकथांच वैशिष्ट्यच अस असत की,त्या एका ठराविक
वळणावर वाचकांना आणून सोडतात..तिथून पुढचा विचार
वाचकांना करायचा असतो..नव्हे तो आपसूकच केल्या जातो..!
चार दिवसापुर्वीच आमचे मित्र प्रा.सावन गिरीधर धर्मपुरीवार
यांनी मोठ्या अगत्याने पाठवलेला,त्यांच
ा पहिलावहिला लघुकथासंग्रह 'बाॅर्न इन द गारबेज' साभार
भेटला..विजय प्रकाशन,नागपुर ह्यांनी प्रकाशित केलेला,विवेक
रानडे ह्यांचे सुंदर मुखपृष्ठ आणि के.ज.पुरोहित 'शांताराम' व
आशाताई बगे यांची सुंदर प्रस्तावना लाभलेला..व तितक्याच
आशयघन,काळजाचा ठाव घेणार्या कथांनी परिपुर्ण
असलेला..मुखपृष्ठावर 'गारबेज' मध्ये असणार्या वस्तुत
दिसणार्या 'लाल' रंगाच्या ठिपक्यांनी कथा वाचण्याच्या अगोदर
बरचं काही सांगितल..संग्रहाच नाव नी बर्याच
कथा इंग्रजी शिर्षकात आहे..पण उलट त्याने काही वावगं वाटल
नाही..लेखकाच वेगळेपण,कथांच नवेपण ह्या नावांनी अधिक ठळक
जाणवतयं..नव्हे ते समर्पकही आहेच..!
लेखकाच्या बर्याच
कथा स्वतःच्या अवतीभोवती घडलेल्या वाटतात.रोजच्या जगण्याच्या धावपळीतून
आपल्या आजुबाजुला बघण्याची लेखकाची दृष्टी सकस
आहे.'नागपुरी वैदर्भीय बोली' व नागपुरच्या आसपासचे संदर्भ
लेखकाची आपल्या मातीशी घट्ट असलेली नाळ दर्शवितात..!
एकून नऊ कथांचा समावेश असणार्या ह्या संग्रहाने आपले
'वेगळेपण' निश्चित जपले आहे.पहिल्याच 'मेजवानी' कथेत
माणसांचे स्वार्थी,विकृत चेहरे,मेलेल्याला पुनः मारणारे,मुडद्या
ंच्या टाळूवरचं लोणी खाणार्या नराधमांचे दिसतात.मन,सुन्न
होत..,अन आपल्या भोवतालचे 'असे' चेहरे ठळक
जाणवायला लागतात.'मोलकरीन' कथेत मोलकरणींची कामे
करून,शिक्षणात यश मिळवणार्या 'गौरी'च कौतुक वाटत..पण
गौरीच्या मेहनतीला सलाम करणार्या,जीवनाच तत्वज्ञान
समजलेल्या 'केतकी'चा खर्या अर्थान अभिमान
वाटतो.कथेची खरी नायिका 'केतकी'च हे जानवून जात.'वेटींग फाॅर
व्हॅलेन्टाईन' वाचत वाचत शेवटापर्यन्त जातांना, एका तरल
प्रेमकाव्याच्या विश्वात विहरल्यासारखे वाटते.सुंदर शब्द
नी मनाचा ठाव घेणार्या खोल विहिरीसारखं..पण
शेवटी नायकाला 'कॅन्सर' असल्याच कळल्यावर नकळत
'कारुण्याची किनार' मनाला उदास करून जाते.!!
'एकोणतीस मार्च' संग्रहातली सगळ्यात उत्कृष्ठ
कथा ठरावी.,ईतकी ती वाचकांच्या काळजाला हात
घालते..नकळतचं डोळ्यांच्या कडा पाणावल्या जातात..याच खास
श्रेय..लेखकाच्या डोळस असणार्या सामाजिक दृष्टीला...'सवारी'
'जाईजुईंनी गच्च भरलं आकाश' ह्या कथा सामान्यांचे
जगण्याचे,मुलभूत गरजांचे व यामधून
होणार्या जिवाच्या घालमेलीच दर्शन घडवतात.'बायोग्राफी'
कथेतून महाविद्यालयीन शेतकरीपुत्राच मनोविश्व
वाचतांना काळीज करपून जाते..शेतकर्यांच्या समस्यांच्या जवळ
जाणारी कथा..'सेमिनार' ही कथाही अशीच वाचकांवर आपली छाप
सोडून जाते.!!
शिर्षक कथेत,आजच्या भरकटलेल्या तरुणाईच यथार्थ चित्रण
करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत..आजच्या स्वैर
नातेसंबधातून जन्माला आलेल्या अर्भकांची ससेहालपालट
कमालीची अस्वस्थ करते..चिड येते.!
प्रा.धर्मपुरीवार यांचा पहिलाच प्रयत्न प्रभावीपणे, सशक्तपणे
वाचकांच्या पसंतीस उतरला जातो..लेखकाच नवखेपण
कुठेही जाणवत नाही..काळाच्या ऒघात वाहवत असतांना,क्षणभर
का होईना,थोडसं थांबून आपल्या आजुबाजुला बघायला लेखक
भाग पाडतात..!!
प्रा.सावन गिरीधर धर्मपुरीवार यांचे अभिनंदन
आणि भविष्यासाठी खुप शुभेच्छा...!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
  9975767537


बाजार (लघुकथा)

| |

मार्च महीण्यातले रणरणते उनं..गावातला आठवडी बाजार
गच्च फुललेला होता..लग्नसराईचे दिवस असल्यानं सगळ्याच
दुकानवजा पालावर आजुबाजुच्या खेड्यावरील
बाया,माणसे,मुला-मुलींची गर्दी मावत
नव्हती..ज्या मुलींची लग्न ठरलेली होती त्या मैत्रिणीसोबत
कटलरी-स्टेशनरी च्या दुकानावर 'नकपालीस',मेंदी
कोण,पावडर,लाली,चमकी,बिंदी,'भारी'चे सेंट,हातरुमाल,छोटे
आरसे घेतांना मध्येमध्येच वेड लागल्यागत खुदकन हसत
होत्या..या सगळ्यामध्ये बिचार्या दुकानदाराची त्रेधातिरपिट
उडत होती..
यावेळेस जनासेठच्या कपड्याच्या दुकानात बरीच
गर्दी होती..लगनसराईचा भरपुर माल
वाढवलेला होता..पातळे,साड्या,परकर,रुमाल,टोप्या,लुगडे,पिस
व काही रेडीमेड कपड्यांनी दुकान खचाखच भरले होते..दोन
नोकरांना दम नव्हता..मध्येच जनासेठही, ''बाई,कपडा पाह्य
हात लावून..गादीपेक्षा नरम लागते का नाही..पोलिस्तर
थोडीच हाये ते'' अशी वाक्य फेकत मध्येच ''रामराम
हो पाटील..या काय दाखवू?? अशी आवभगत करीत होते..
रामकिसन हलवाई अन त्याची बायको गरमागरम जिलेबी-भजे
काढण्यात गुंग होती..बाजारात थकली-भागली माणसं तिथच
पालात बसून त्यावर ताव मारीत होती..भट्टीवर रामकिसन
असल्यानं त्याच्या टकलातून
येणारा मार्चचा पावसाळा तो राहून राहून
त्याच्या ओल्यागच्च झालेल्या लाल रुमालाला पुसत
होता..समोरच्या तंबाखुवाल्या सदाला केव्हाची भूक
लागली होती..भजे-जिलेबी बघून मन कातावत होतं..पण
बहुदा टकलावरच्या थेंबानी कढईत
मारलेली उडी त्याच्या लक्षात आली असावी म्हणुन गरम
झालेल्या बिसलरीतले दोन घोट बळेबळे त्याने
घशाखाली टाकले..
अफजलमामू 'पानssपानss' म्हणुन नागेलीच्या पानावर
पाणी शिंपून गिर्हाईक करत होता..मध्येच गोल टोपी काढून
डोक्यात आलेला घाम टोपीनेच टिपत होता..कांदे-बटाटे-
लसणवाले ठोक बेपारी गणीभाईने निवांत पुण्यनगरी चाळत
मध्येच मिल्टनच्या बाॅटलमधले थंडगार पाणी घशात
ओतले..व समोरुन गळ्यात पत्र्याची पेटी अडकवून पान -
तंबाखु,खर्रा,पुड्या इ.माल ठेवून चालत्या-बोलत्या
पानटपरीला म्हणजे माधाला हाळी देवून दोन
'कलकत्ता,ज्यादा तंबाखु,बारीक शुप्यारी,किमाम मारके'
पानाची ओर्डर देवून डोक पेपरात घुसवल..त्याचे चार-चार
नोकर गिर्हाईक करतांना घालमेलीस आलेले होते..
अशीच 'बेपारी' लाईन सोडून
पलिकडच्या शेतकर्यांच्या लाईनी होत्या..खताच्या
रिकाम्या पोत्यावर माल टाकलेला,काहींचा टोपल्यात वर पाल
नाही पण काहींच्या मोडक्यातोडक्या छत्र्या,काहींच्
या डोक्यावर फडके..व
तेलाच्या रिकाम्या झालेल्या पंधरा लिटरच्या कॅनला ओलं
फडकं बांधून जिवाचा बाजार सुरु होता..
लख्या..जेमतेम नऊ-दहा वर्षाच पोरगं..उन्हानं
म्हणा की जन्मतःच म्हणा,काळाठिक्कर चेहरा..कैक दिवसात
अंघोळ-तेलपाणी न मिळाल्याने राठ झालेले केस..हातापायावर
चा मळ दुरुनही स्पष्ट
लक्षात येईल इतका..अनवाणी..खाकी हाफपॅन्ट..मागून बरोबर
फाटलेली..करदोड्याने टाईट केलेली..शर्ट दोन्ही बाह्यावर
फाटलेला..आणि त्याच्यासारखाच मळका..डोळे सतत
भिरभिर..हातात कसलीशी एक
छोटी डब्बी...आणि अशा अवतारात ही मुर्ती अवघा बाजार
पायाखालून घालत होती..माय याच्या जन्मासोबत वर
गेलेली..एक मोठी बहिण गुदस्ता लग्न
झालेली..बिचारी मनासारखा हुंडा देता आला नाही म्हणून
गरीबाघरी पडलेली..अन लग्नाच कर्ज,अवकाळी पावसानं
खचलेल्या 'बा' दोन महिण्यापूर्वी फाशी घेवून 'मायला'
भेटायला गेलेला..याच्या बापाची उरलीसुरली दोन ऎकर
चुलत्यांनी कांगावा करून हडपलेली..त्यामुळे 'आपलं' म्हणावं
अस कुणी नसलेला हा 'लख्या' ,मिळेल तस खात,मिळेल तस
पित..जगत होता..
टोप्यावाल्या दुकानाशी येवून तो रेंगाळला..लाल,प
िवळ्या,पांढर्या किती मस्त दिसत होत्या..'मायला मोठं
झालो की मी बी यक घिन अशी..''मनातल्या मनात पुटपुटत
तो फोटोवाल्याच्या दुकानापुढे उभा राहिला..फोटोतल्
या निसर्गात,धबधब्यात,मोठ्ठ्या घरात तो हरवून गेला..''ऎ
चल रे.. हट उधर''..दुकानवाल्याचा आवाज
आला अन..त्याच्याकडे जळजळीत पाहत
तो पुढे,सरकला..खेळ
ण्याच्या गाडीवरची खेळणी पाहायला..तो अगदी जवळ
उभा राहीला...तो लहान हत्ती हातात घेणार तोच
दुकानदाराची काठी त्याच्या हातावर बसली..हात चोळत
''ह्याच्या मा...'' पुटपुटत तो निघाला..टरबुजवाल्याने फार
मोठा पाल लावला होता..दोन मिनिट तो तिथे स्थिरावला...हिर
वे हिरवे,गावरान टरबुज,महिकोचे सापासारखी नक्षी असणारे
संकरीत टरबुज...पाहूनच कसं थंडगार वाटत
होत...निघायची ईच्छा नव्हती पण थांबुनही काही साध्य
नव्हत..
फिरत फिरत तो पुढ चालत होता..पाय भाजून निघत होते..एक-
एक पाय लवकर लवकर उचलून तो त्यांना आराम देत
होता..गरमीने सगळं अंगाला खाज येत होती..
इतक्यात त्याच्या नाकात भजे आणि जिलेबीचा खमंग सुगंध
भरला..वासाचा शोध घेत तो रामकिसनच्या दुकानापर्यन्त
आला...बराच वेळ गोल गोल अढ्याची पाकात
भिजलेली जिलेबी..वेगवेगळ्या आकाराचे भजे बघून
त्याला कसनुसं होवू लागलं.. ''काय फायजे रं पोरा?''
रामकिसनच्या जबरी आवाजान तो दचकला..मानेनच 'काय
नाही' अस सांगितल..''मंग जाय की तिकडं..हिथ
का उभा ठाकलास..'?? रामकिसन डोळ्यांनी दटावत
म्हणाला..
लख्या जरा रामकिसनला दिसणार नाही अशा बेतात अलिकडे
आला..काहीतरी मनात ठरवल होत त्यान..तो फक्त योग्य
संधी बघत होता..इतक्यात एका लुगड्यावाल्या बाईन एक पाव
जिलेबी मागीतली..रामकिसनच्या बायकोने एक पाव
जिलेबी मोजून तिथेच जिलेबीच्या ताटात ठेवली..अन
पैशाची वाट पाहू लागली..म्हातारीने कमळाला हात घालत
कमरेची पिशवी काढली..अन इतक्यात लख्याने
वार्याच्या वेगाने येवून जिलेबीच पुडकं उचललं
नी जिवाच्या आकांतान पळायला सुरुवात केली..रामकिसनच्
या बायकोने गलका करताच भट्टीवर आडवा झार्या ठेवून
रामकिसन लख्याच्या पाठी धावला...
पण लख्या कसला गावतो..दुकानाच्या रांगा ओलांडत..धक्के
खात,धक्के देत...तो पळतच होता..शाळेच्या मागे
पळता पळता एक भली मोठी बाभळीची फांदी ओरबाडली व
ती चुकवायच्या नादात त्याचा तोल
गेला..तो नेमका शेजारच्या चिखलाच्या डबक्यात...पण
जिलेबीच्या पुडक्याला त्याने चिखलाचा स्पर्श होवू
दिला नाही...सगळा चिखलानं बरबटलेला...हातापायाचे कोपर-
ढोपर सोलून लख्या बाहेर आला...मागे कुणाचा मागमूस दिसत
नव्हता..
निवांत चालत तो शाळेजवळच्या हापशीवर आला..पुडकं
जवळच्या लिंबाच्या झाडाच्या सावलीत
ठेवलं...हापशी एकदा हापसून तो पटकन
धारेखाली बसायचा..खुप बरं वाटत होत..अगदी सगळा चिखल
निघून गेल्यावरही बराच वेळ त्याचा खेळ सुरु होता...
बर्याच वेळानंतर त्याला जिलेबीची आठवण झाली..पटकन
ऒलेत्या कपड्यानिशी धावत तो पुडक्याकडे
आला...पाहतो तो काय...लिंबाच्या थंडगार सावलीत
अर्धी अधिक जिलेबी खाऊन दोन
कुत्र्यांचा पुडक्यासाठी झोंबाझोंबी चालू होती..
उन्हाने आता चांगलाच जोर धरला होता...बाजार
जिवांना चांगलाच राबवून घेत फुलून आला होता..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
  9975767537