वाटले आयुष्य हे...(गझल)

| |

वाटले आयुष्य हे काखेत होते..
शेवटी कळले वसाडे शेत होते..!!

हा व्यथांचा पावसाळा नेहमीचा..
वीज चमकावी तसे सुख येत होते..!!

जपत गेलो जिंदगीभर देह अवघा..
मग समजले 'यार हे तर प्रेत होते.'.!!

कोण 'मंबाजी' इथे आला असावा..?
केवढे काटे असे वाटेत होते...!!

वेळ गेला गोल करण्या भाकरीला..
अन निखारे तोवरी राखेत होते..!!

मन कधीचे फाटले..चिंध्या उडाल्या..
लोक देहाला दिलासा देत होते..!!

फोडुनी कातळ उगा का कोंब येतो..?
जीवनाचे हे खरे संकेत होते..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
  9975767537