दार नाही लावले..(गझल)

| |

परत जातांना सुखाने,दार नाही लावले..,
हेरले तितकेच आणिक,त्या दुखाचे फावले..!!

मोह झाला कांचनाचा,कैकदा मज जीवनी..,
त्याचवेळी झोपडीने,ते 'कवडसे' दावले..!!

फाटक्या पदरास माझ्या,ह्या फुलांनी टाळले..,
वाट माझी पाहणारे,तेच काटे भावले..!!

रोजची ती देवपूजा,आज झाली सार्थकी..,
दूर करण्या दुःख माझे,'यम' मला हे पावले..!!

तू म्हणाली चांदणे दे,सिद्ध करण्या प्रेम हे..,
पाहता अंधार घरचा,मन उगाचच कावले..!!

सोडतांना गाव माझे,तू न मागे पाहले..,
श्रावणास पुरेल इतके,थेंब नयनी मावले..!!

लोप झाला संस्कृतीचा,देव झाला खेळणे..,
सोडले किर्तन बुवांनी,नर्तनाला धावले..!!

आम जनता पायपुसणे,राज्यकर्त्यांच्या घरी..,
लोकशाहीला कसे या,ढेकणांनी चावले..??

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..