हे रोजचे तुझे बघ.. (गझल)

| |

हे रोजचे तुझे बघ,लटके रुसून जाणे..,
पाणावल्यावरी मी,हलके हसून जाणे..!!

तू चाळतेस माझे,पंचांग रोज सखये..,
आता तरी जमूदे,शुक्राचे फसून जाणे..!!

होतात का असे हे,आभास पावलांचे..,
आवाज पैंजनांचे,कानी ठसून जाणे..!!

आहे फितूर येथे,जन्मास लाभलेले..,
त्यांचे छळून जाते,सोबत बसून जाणे..!!

वक्तृत्व दूर आहे,माझ्यामधून मित्रा..,
तरिही सभेस कळते,माझे असून जाणे..!!

सरकार तेच टिकते,ज्यांना जमून येते..,
तोंडास ह्या प्रजेच्या,पाने पुसून जाणे..!!

मोहास टाळणेही,घ्यावे शिकून आता..,
वाटेवरी श्रमाच्या,कंबर कसून जाणे..!!

सोडून दूर गेली,माझीच सावली मज..,
अंधार याद देतो,तुझिये नसून जाणे..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर...