वाढे उन्हाचा हा जोर (अष्टाक्षरी काव्य)

| |

वाढे उन्हाचा हा जोर
फुले आंब्याला मोहोर..
पान-पान झाडाखाली..
कोण टाकतो हा चोर..!!

गर्द रानात पळस..
दारी बोडखी तुळस..
भर ऊन्हाने चकाके..
तुझ्या मंदिरी कळस..!!

ढग हिरवे संपले..
झाले रस्ते फुफाट्याचे ..
शेत भयान उदास...
झाले वाळल्या काट्यांचे..!!

दिस संपता संपेना..
ओल कुठेच दिसेना..
कोमेजला मोगराही..
बघ सांजेला हसेना..!!

मनाभोवती सावली..
ऊन उतरता आली..
गर्दी आठवांची तुझ्या..
अवचित जमा झाली...!!

कसा लख्ख आठवला..
भिजलेला पावसाळा..
तुझ्या संगती सोबती..
गोड झालेला हिवाळा..!!

झळा पुरतील मला..
क्षणोक्षणी अशा आता..
शिकवेल जगण्याचे..
याद तुझी जाता-येता...!!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537