माहेर (अष्टाक्षरी कविता)

| |

दोन दिसांच माहेर
लाख जिव्हाळ्याचा ठेवा
सुखी ठेव रखुमाई
एकुलत्या ऎक भावा..!! 

सणसुदी घरी येता
माय करितासे सय
दोन थेंब डोळ्याखाली
लेकीसाठी झुरी जाय..!! 

दोन दिसांची पाहुणी
लेकबाळं घरी येते
तवा मायंच काळीज
झुल्यावर झुले घेते ...!! 

कानांवर बोटे आठ
तीची कडाकडा वाजे
पटापट घेई मुके
देव्हार्यात मुर्त साजे ..!! 

काय देवू काय नको
काय खाते मायबाई?
सुपाएवढ्या मनाची
लगबग सुरु होई ..!! 

माय लेकींच हे गूज
भाऊ डोळा भरु पाहे
मग त्याच्या डोळ्यावाटे 
पूर्णामाय जणू वाहे ..!! 

बाप बापाच्याच जागी
चूप न्याहाळते सारं
त्याच्या मुक्या डोळ्यातही
वात्सल्याच दिसे वारं ...!! 

असं माहेर माहेर
जीव लागे बाई फार
घट्टे पडल्या हाताला
जणु लोणी मऊशार ..!! 

अशा माह्या माहेराला
बाई दिटं लागो नाही
माहेराच्या मायेची मी
कशी होवू  उतराई..!! 

-गणेश शिंदे ,दुसरबिडकर