एवढीही खास नाही जिंदगानी (गझल)

| |

एवढी ही खास नाही जिंदगानी...
पण गळ्याला फास नाही जिंदगानी.!!
आकडेमोडीत नसतो खेळ सारा..
भूमितीचा तास नाही जिंदगानी..!! 
वाढता वय जाणले मर्मास मी ह्या..
सोडलेले श्वास नाही जिंदगानी..!!
रोज आभाळात मी कुठवर बघावे..?
चांदण्यांची रास नाही जिंदगानी..!!

स्वप्न गोंजारीत बसण्या वेळ कुठला..
फक्त नुसते भास नाही जिंदगानी..!!
कष्टणारे हात देवा दे मला तू..,
प्राक्तनाची दास नाही जिंदगानी..!!
भाकरीलाही कळे बघ हा इशारा.., 
कोवळा मधुमास नाही जिंदगानी..!!
                              - गणेश शिंदे,दुसरबिडकर.
                                              9975767537