गझल:आरशाचा चेहराही...

| |

आरशाचा चेहराही,माणसाला टाळतो,
आतल्या खोट्या,मुजोरी,राक्षसाला टाळतो!!

येत-जाता आग लावी,जो शहाणा कैकदा,
पाहतो वरती नभा अन,पावसाला टाळतो!!

चोरट्याची वाच गाथा,बघ कळे मग काय ते,
रातचा हा खेळ म्हणोनी,तो दिसाला टाळतो!!

कर्ज घेता दोर येतो,अन गळ्याला लागतो,
याचसाठी हा कृषक त्या,कापसाला टाळतो!!

बापबेटे दौलतीने ,वेगळाले जाहले...,
यामुळे तर एक बाबा,वारसाला टाळतो!!

देशद्रोही वाढले बघ,घेच मित्रा,कार्य तू,
पाहतो मग देशसेवा,कोण साला टाळतो!!

'मी'पणाने अंत होतो,फार थोडे जाणती,
हा 'गणेशा'याच 'मी'च्या,साहसाला टाळतो!!
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
-निशिगंध(गणेश शिंदे,दुसरबिडकर)
:+919975767537