जरा टाक मागे...(मात्रावृत्त गझल)

| |

जरा टाक मागे,तुझ्या लोचनांना,
किनारा कधीचा,इथे थांबलेला..
बटांना तुझ्या दे,क्षणांचा विसावा,
बिचारा असा वात,भांबावलेला...!!

कळावा कळीला,ऋतूंचा शहारा,
खुलावे खळीने,कळी लाजतांना,
नको भार पेलू,मुक्या भावनांचा,
दवाचा दिसे थेंब,ऒथंबलेला..!!

मिळो वेळ थोडी,शहाण्या क्षणांना,
तुझा खेळ माझ्या,मनाने शिकावा,
हरावे-उरावे ,तुला पाहतांना.....,
मनाशी मनातून,मी दंगलेला..!!

पुन्हा वेच थोडी,फुले रातराणी,
तुझा गंध त्यांनी,उधारीत घ्यावा,
हसावे जरासे,फुलांनी,फुलूनी,
उगा देह होवून,गंधाळलेला....!!

असे काव्य माझे,तुला आठवावे..,
तुझ्या अंतरंगी,जरा साठवावे....,
तुलाही छळावा,असा एक पारा..,
तुझ्या भोवती जो,दिसे पांगलेला..!!!

-निशिगंध(गणेश शिंदे,दुसरबिडकर©®)
:+919975767537